सांगली : जिल्ह्यातून केळी थेट प्रयागराज येथील महाकुंभमेळा येथे विक्रीसाठी गेली आहे. तेथे प्रतिक्विंटल २१०० रुपये भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
केळीला मागणी वाढताच दरातही तेजी आली आहे. गेल्या दोन महिन्यांत केळीचे दर गडगडले असले तरी सद्यःस्थितीत केळीला प्रतिक्विंटल २००० ते २१०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. गेल्या वर्षभरातील उच्चांकी दर असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
जिल्ह्यात ऊसपट्टयातही केळीचे क्षेत्र वाढत आहे. जिल्ह्यात ९७६ हेक्टरवर केळीची लागवड झाली आहे. एकरी ३० टनांपर्यंत केळीचे उत्पन्न मिळत आहे. वाढत्या मागणीमुळे निर्यातीच्या केळीला २००० ते २१०० रुपये क्विंटल दर मिळत आहे.
पहिल्यांदाच अशा प्रकारे दर मिळाला आहे. नोव्हेंबरपासून केळीचे दर गडगडले होते. सध्या केळीला चांगला दर असून जानेवारी महिन्यापासून केळीला मागणीही वाढली आहे.
दरात झाली सुधारणा
नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात केळीला ८०० ते ९०० रुपये क्विंटल असा दर मिळाला होता. जानेवारी २०२५ मध्ये दरात सुधारणा होऊन निर्यात वसई केळीला २००० ते २१०० रुपये दर मिळत आहे, असे निर्यातदार व्यापाऱ्यांनी सांगितले. वर्षांच्या संघर्षानंतर आता कुठे केळी उत्पादकांमध्ये समाधान आहे.
असे आहेत केळीचे दर (क्विंटल)
केळीचा प्रकार | डिसेंबर २०२४ | फेब्रुवारी २०२५ |
वसई | ८०० ते ९०० | १८०० ते २१०० |
देशी | २२०० ते २३०० | २७०० ते २८०० |
ऊस लावून कंटाळलो होतो, म्हणूनच केळीची लागवड केली. प्रतिक्विंटल १८०० ते २००० रुपये दर मिळाला आहे. बऱ्याच दिवसांनंतर चांगला दर मिळाला आहे. यामुळे उत्पादन आणि खर्चाचा मेळ बसला आहे. उसापेक्षा केळीतून चांगले उत्पन्न मिळाले. - राजवर्धन शिंदे, शेतकरी, आष्टा
केळीचे उत्पादन कमी आहे. महाकुंभमेळ्यासह मुंबई, पुणे येथेही मागणी वाढली आहे. म्हणून केळीच्या दरात वाढ झाली आहे. निर्यात केळीला प्रतिक्विंटल १८०० ते २१०० रुपये दर मिळत आहे. देशी केळीच्या वाढ असून, २७०० ते २८०० रुपये क्विंटल दर आहेत. - अभय म्हारगुडे, केळी व्यापारी, सांगली