दिवाळी सणामुळे शेतीची कामे काही काळ ठप्प झाल्याने कांदाबाजारातील आवक घटली असून, त्याचा थेट परिणाम भावावर झाला आहे.
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी कांद्याने अनेक दिवसांनंतर २०० रुपयांचा टप्पा ओलांडला. गोळा कांदा प्रति दहा किलो २११ रुपये या विक्रमी भावाने विकला गेला.
मात्र, आवक वाढल्यानंतर भाव पुन्हा खाली येण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करत आहेत. दिवाळीमुळे शेतकरी कांदा बाजारात आणण्यास टाळाटाळ करत होते. त्यामुळे आवक कमी झाली आणि भाव वाढले.
रविवारी झालेल्या लिलावात चांगला कांदा १४० ते १८० रुपये, मध्यम कांदा १२० ते १४० रुपये तर छोट्या आकाराचा कांदा ६० ते १०० रुपये प्रति दहा किलो या दराने विकला गेला, अशी माहिती व्यापारी बाळासाहेब रंगनाथ बाणखेले यांनी दिली.
बऱ्याच दिवसांनंतर कांद्याने २०० रुपयांचा टप्पा गाठला असला, तरी आवक वाढल्यानंतर भाव पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने कांद्यासंदर्भात योग्य धोरण आखून भाव स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
उत्पादनात झाली वाढ
◼️ यंदा कांद्याच्या वाढीव लागवड क्षेत्रामुळे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले. परिणामी, बाजारभाव कोसळले आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले.
◼️ अनेक शेतकऱ्यांनी कांदा बराकीमध्ये साठवून ठेवला होता; मात्र सड होऊ लागल्याने नुकसान सहन करावे लागले.
◼️ मागील काही दिवसांपासून प्रति दहा किलोला १०० ते १५० रुपये असा कमी भाव मिळत होता.
◼️ मध्यम प्रतीच्या कांद्याला तर शंभर रुपयांच्या आतच भाव मिळाला.
◼️ भांडवली खर्चात झालेली वाढ आणि कमी भाव यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले होते. नाईलाजाने त्यांनी कांदा विक्रीसाठी बाजारात आणला.
अधिक वाचा: पुढील पाच दिवस राज्यातील 'या' भागात वीजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडणार
