संजय लव्हाडे
पावसाने दमदार सुरुवात केल्यामुळे बाजारात सध्या उत्साह आहे. इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे सोने-चांदीच्या दरात ऐतिहासिक तेजी आली आहे तर शेअर बाजारात मंदी आली आहे. खाद्यतेल देखील महागले आहे. तसेच तूर, तूरदाळ, हरभरा, उडीद, उडीद डाळ स्वस्त झाली आहे.
शुक्रवारी सकाळी इस्त्रायलने इराणवर जोरदार हल्ला केला. त्यामुळे देशभरातील सराफा बाजारावर त्याचा परिणाम झाला. त्याचबरोबर कच्च्या तेलात मोठी तेजी आली आणि जगभरातील शेअर बाजारात मोठी घसरण झाली.
दरम्यान भू-राजकीय तणाव वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे सोन्याच्या किमती नवीन विक्रमी उच्चांक गाठू शकतात, असा जाणकारांचा अंदाज आहे. राज्याच्या जालना बाजारपेठेत सोन्याचे दर १ लाख रुपये प्रतितोळा आणि चांदीचे दर एक लाख सात हजार रुपये प्रतिकिलो असे आहेत.
खाद्यतेलांच्या दरात मागील पंधरवड्यात मंदी बघायला मिळाली. मात्र, शुक्रवारी त्यात किंचित तेजी आली. पामतेल १२५००, सूर्यफूल तेल १४४००, सरकी तेल १३२०० आणि संस्कृती सोयाबीन तेलाचे दर १२६०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत.
हमीभावापेक्षा कमी दराने विकली जातेय तूर
• देशांतर्गत डाळींच्या दरांवर मोठा दबाव आला आहे. विशेषतः तुरीच्या दरावर याचा थेट परिणाम झाला असून, सध्या बाजारात तूर हमीभावाच्या तुलनेत बऱ्याच कमी दराने विकली जात आहे.
• २०२४-२५ या खरीप वर्षासाठी तुरीसाठी ७५५० रुपये आणि पुढील वर्षासाठी ८००० रुपयांचा हमीभाव सरकारने निश्चित केला आहे. मात्र, प्रत्यक्ष व्यवहारामध्ये तूर केवळ ५७०० ते ६५५० रुपये प्रतिक्विंटल या दराने विकली जात आहे.
• उत्पादकांना प्रतिक्विंटल सुमारे १००० ते १५०० रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. तूर डाळीचे दर ६००० ते ११५०० रुपये आहेत.
पिवळ्या वाटाण्याच्या आयातीवरील शुल्क रद्द
• सरकारने पिवळा वाटाण्याच्या आयातीवर लागणारे शुल्क रद्द केले. त्यामुळे बाजारात पिवळा वाटाणा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला. सरकारच्या या निर्णयामुळे हरभऱ्याची आवक वाढत आहे. त्यामुळे हरभऱ्याचे दर घसरले.
• सध्या बाजारात हरभऱ्याची आवक कमी आहे. पुढील काळात ही आवक आणखी कमी होईल. सणासुदीच्या दिवसात हरभऱ्याच्या दरात तेजी येण्याची शक्यता आहे.
• जालना बाजारपेठेत हरभऱ्याचे दर ५२५० ते ५४५० रुपये प्रतिक्विंटल असे असून, हरभरा डाळीचे दर ५५०० ते ७५०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत.
उडद डाळीची आवक कमी
• बाजारपेठेत उडदाची आवक मागणीच्या तुलनेत कमी आहे. मात्र, तरीही उडदाला हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहे. पुढील दोन महिने उडदाची आवक कमी राहण्याची शक्यता आहे.
• त्यामुळे उडदाच्या दरात काहीसे चढ-उतार होण्याची शक्यता आहे. जालना बाजारपेठेत उडदाचे दर ६००० ते ६९०० रुपये प्रतिक्विंटल असे असून, उडद डाळीचे दर ६५०० ते ११२०० रुपये प्रतिक्विंटल असे आहेत.
हेही वाचा : परिपूर्ण नियोजनाचा झाला फायदा; वादळात केळी आडवी पण काकडीने दिला आधार