जवळा : गेल्या महिनाभरात केळीच्याबाजारभावात मोठी घसरण झाली आहे. काही दिवसांपूर्वी प्रति क्विंटल २२०० ते २७०० रुपये क्विंटलने विकली जाणारी केळी आता फक्त १२०० ते १७०० रुपयांवर आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
मागील महिन्यात जिल्ह्यातील प्रमुख बाजारांमध्ये केळीला चांगला भाव मिळत होता. तेव्हा प्रति क्विंटल दर २२०० ते २७०० रुपयांच्या घरात होता. मात्र, अचानक आलेल्या घसरणीमुळे हे दर १२०० ते १७०० रुपयांवर आल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
अनेक शेतकऱ्यांनी केळी लागवडीसाठी दीड ते दोन लाख रुपये खर्च केले, परंतु एवढा मोठा खर्च करून मिळणारा परतावा नगण्य ठरत असल्याने शेतकरी खचून गेले आहेत.
सध्या केळीचा हंगाम सुरू असून, या परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीचा हात सरकारकडून मिळावा, अशी मागणी होत आहे.
केळीचा दर गेल्या महिन्यात २२०० ते २७०० रुपये प्रतिक्विंटल होते, परंतु, आता स्थानिक बाजारात हे भाव १२०० ते १७०० रुपये क्विंटलपर्यंत खाली आले आहेत. गुणवत्ता व आकारानुसार भावात चढ-उतार होत असला, तरी सरासरी भाव कोसळल्याने उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे.
५ महिन्यांत असे घसरले भाव
महिना - प्रति क्विंटल भाव
मे - २२०० ते २७००
जून - २००० ते २५००
जुलै - १८०० ते २३००
ऑगस्ट - १५०० ते २०००
सप्टेंबर - १२०० ते १७००
बाजारात ५० रुपये डझन
केळीचे घाऊक भाव कोसळले असले, तरी किरकोळ बाजारात ग्राहकांना फारसा दिलासा मिळालेला नाही. शहरातील किरकोळ विक्रेते आजही ४० ते ५० रुपये प्रति डझनने केळीची विक्री करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असतानाच, ग्राहकांच्या खिशालाही झळ बसत आहे.
ऐन सणासुदीत भाव कोसळले
◼️ सणासुदीच्या काळात बाजारात केळीची मागणी वाढेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, वास्तविकता वेगळी ठरली.
◼️ वाढलेली आवक, अतिवृष्टीमुळे वाहतुकीचा अडथळा आणि ग्राहकांकडून अपेक्षित मागणी नसल्याने भाव कोसळले. अनेक शेतकऱ्यांनी या काळात पिकासाठी मोठा खर्च केला, पण सध्या उत्पादन खर्चही वसूल होत नाही.
अतिवृष्टी, वाहतूक ठप्पचा फटका
◼️ अतिवृष्टीमुळे अनेक रस्ते बंद आहेत. त्यामुळे शेतमाल वेळेत बाजारात आणता आला नाही. बाजारात एकाच वेळी मोठ्या प्रमाणात आवक झाली.
◼️ पुरवठा वाढून मागणी कमी झाल्याने भाव आणखी कोसळले. हवामान अनुकूल राहिले असते, वाहतूक नियमित सुरू असती, तर दर इतके पडले नसते, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
दोन एकरांत दीड ते दोन लाख रुपये खर्च करून केळी लागवड केली, पण सध्या केळीला भाव मिळत नसल्याने पिकांवर केलेला खर्च काढायचा कसा, असा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय करायचे, अशी चिंता लागली आहे. - आत्माराम मोहळकर, शेतकरी, जवळा
अधिक वाचा: हवामान स्थिर होण्यास सुरुवात; मान्सून 'या' तारखेला राज्यातून निरोप घेण्याची शक्यता