मंगळवेढा : खरीप हंगाम २०२४-२५ अंतर्गत शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व मका, ज्वारी, यांसह भरडधान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यास ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
याबाबत राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्यावतीने शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.
राज्यातील अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणी, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तसेच अन्य कारणांमुळे वेळेत नोंदणी करता आली नव्हती.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, आदिवासी विकास महामंडळ तसेच विविध जिल्हास्तरावरून नोंदणीस मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती.
मुदतवाढीच्या मागणीचा सकारात्मक विचार करत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी ही मुदतवाढ जाहीर केली आहे.
शासनाच्या खरीप पणन हंगाम २०२४-२५ योजनेनुसार, धान व मका, २ ज्वारीसह भरड धान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करणे अनिवार्य आहे.
नोंदणी पूर्ण केलेल्या पात्र शेतकऱ्यांकडूनच शासनामार्फत आधारभूत किमतीने धान्याची खरेदी करण्यात येणार आहे.
शासन निर्णयानुसार, संबंधित यंत्रणांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील भरड धान्य उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, अधिकाधिक शेतकऱ्यांना शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घेता येणार आहे.
शेतकऱ्यांनी दिलेल्या मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह आपली ऑनलाईन नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
अधिक वाचा: ओंकार साखर कारखान्याचा ऊस दर जाहीर; टप्याटप्याने दरात किती रुपयांची वाढ मिळणार?
