करमाळा : अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर जोरदार हल्ले चढविल्याने त्याचा मोठा फटका सोलापुरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.
सोलापूर जिल्ह्यातून इराण, इराक, सौदी, बहरीन, कुवेत येथे नवी मुंबई येथील जेएनपीटी बंदरावरून जलमार्गे पाठविण्यात आलेल्या निर्यातक्षम केळीचे २५० कंटेनर दुबई व इराणच्या मध्यभागी असलेल्या हारमूज बंदरावर शनिवारी रोखण्यात आलेले आहेत.
युद्धजन्य परिस्थितीमुळे कंटेनर असलेले जहाज पुन्हा नवी मुंबईच्या जेएनपीटी बंदराकडे वळविण्यात आलेले आहेत. यामुळे केळी उत्पादकांना आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचा फटका बसणार आहे.
सोलापूर जिल्ह्यात वर्षभरात पंधरा लाख मेट्रिक टन उत्पादन होते. त्यापैकी ४० टक्के केळी स्थानिक बाजारपेठेत व देशातील इतर राज्यांमध्ये विक्री होतात. उर्वरित ६० टक्के केळीची आखाती देशांत विशेषतः इराणमध्ये निर्यात केली जाते.
निर्यातक्षम केळी उत्पादनामुळे या पिकाच्या माध्यमातून ४ हजार कोटींची उलाढाल येथे होत असून, गेल्या वर्षी जिल्ह्यातून ३९ हजार ७२७ कंटेनर निर्यात होऊन ४ हजार कोटी रुपयांचे परकीय चलन या व्यवसायातून देशासाठी उपलब्ध झाले.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा व माढा हे दोन तालुके केळीचे हब म्हणून ओळखले जातात. या दोन तालुक्यांतून सर्वाधिक केळी आखाती देशात निर्यात होतात.
मागील पाच वर्षांतील स्थिती
निर्यात वर्ष - केळी कंटेनर - वजन (मे. टन)
२०२०-२१ - १२,५९३ - २,५१,८६०
२०२१-२२ - १८,३०८ - ३,६०,७६०
२०२२-२३ - २७,२६४ - ५,७२,५४४
२०२३-२४ - ३,४८१ - ७,१५,७०१
२०२४-२५ - ३९,७२५ - ८,२६,३२२
सन २०२५-२६ या चालू वर्षासाठी जिल्ह्यातून पन्नास हजार कंटेनर निर्यातीचा अंदाज वर्तविण्यात आला होता.
आखाती देशांत निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यातक्षम केळीचे जहाजावरील कंटेनर दुबईजवळील हारमुज बंदरावर रोखण्यात आलेले आहेत. रोखलेले कंटेनर पुन्हा आपल्या देशातील जेएनपीटी बंदरावर परतीच्या मार्गावर निघाले आहेत. जोपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत आखाती देशात केळीचे कंटेनर पाठवणे धोक्याचे ठरणार आहे. कंटेनर मधील सर्व माल देशांतर्गत बाजारपेठेत विक्री करावा लागणार आहे. - सनी इंगळे, केळी निर्यातदार, फलटण, जि. सातारा
अधिक वाचा: जनावरांच्या चाऱ्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले; शाळूच्या कडब्याला शेकडा काय मिळतोय दर?
