करमाळा : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा व माढा तालुक्यांना राज्यातील प्रमुख केळी उत्पादक क्षेत्र म्हणून अलीकडे ओळखले जाऊ लागले आहे.
या भागातील केळी उत्पादकांवर दर घसरणीचे संकट आले होते. जळगावपेक्षाही सोलापुरी केळीला गोडवा असल्याने इराणमधून मागणी वाढली आहे. पुढील आठवड्यात केळीच्या दरात अपेक्षित सुधारणा होईल.
सध्या खोडवा केळीचा दर २.५० ते ५ रुपये किलो एवढा आहे. मागील आठवड्यात २६ रुपये किलो दराने विकली जाणारी निर्यातक्षम केळी आता १५ ते २० रुपयाना विक्री होत आहेत.
वादळी वारे, गारपीट आणि बिगरमोसमी पावसाच्या संकटांना तोंड देऊन उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना आता दर घसरणीच्या संकटाचा सामना करावा लागत आहे.
शेतकऱ्यांची पिळवणूक
पुणे, मुंबई शहरामध्ये डझनाला ३० ते ४० रुपये दराने केळी विकली जात असताना, शेतकऱ्यांकडून व्यापारी वर्ग अत्यल्प दराने खरेदी करीत असल्याने पिळवणूक होत असल्याची भावना व्यक्त होत आहे
दिवाळीपूर्वी निर्यातदार कंपन्या नवती केळी २४ ते २६ रुपये किलो दराने खरेदी करत होत्या. मात्र दिवाळीनंतर एजंट, व्यापारी आणि निर्यातदार कंपन्यांनी संगनमत करून दर पाडल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. 'बंदरात शिप नाही', 'शिपची तारीख पुढे ढकलली आहे', 'दिवाळीत मागणी कमी झाली' अशी कारणे देत कंपन्यांनी दर कमी केले. याचा फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. - राजेंद्र बारकुंड, केळी उत्पादक शेतकरी
भारतामधून निर्यात होणाऱ्या एकूण केळ्यांपैकी ७० टक्के केळी इराणला पाठवली जातात. मध्यंतरी इराण बाजारात पाकिस्तानमधून केळीची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने भारतीय केळीच्या दरात घसरण झाली. तथापि, अलीकडे इराणकडून पुन्हा मागणी वाढली असून पुढील ८ ते १० दिवसांत दरात सुधारणा होण्याची शक्यता आहे. - सनी इंगळे, केळी निर्यातदार, फलटण
अधिक वाचा: कृषि विभाग योजनेतील गैरव्यवहार चौकशीला येणार वेग; आता 'ह्या' नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती
