हवामानातील अस्थिरता, वाढती थंडी आणि बुरशीजन्य आजार काळा मंगू यामुळे मोसंबीचे प्रचंड नुकसान झाले असून, बाजारातही भाव कोसळले आहेत. हंगाम शेवटच्या टप्प्यात पोहोचला असला तरी शेतकऱ्यांना अपेक्षित दर न मिळाल्याने जालना जिल्ह्यातील मोसंबी बागायतदार सध्या अभूतपूर्व संकटातून जात आहेत.
मागील काही दिवसांपासून थंडीची तीव्रता वाढली आहे. सकाळी दाट धुक्यामुळे मोसंबीवर काळपट डाग दिसू लागले आहेत. काळा मंगूचा प्रादुर्भाव वाढल्याने फळांची गुणवत्ता कमी झाली असून, बाजारात त्यांना दरही मिळत नाही. सध्या चांगल्या मोसंबीला अवघे १० ते १३ हजार रुपये टन असा दर मिळत आहे, जो शेतकऱ्यांना मोठा फटका मानला जात आहे.
यंदा पावसाळा लांबल्याने बागेत चिखलाची समस्या होती. त्यामुळे शेतकऱ्यांना मोसंबीची वेळेत तोडणी करता आली नाही. परिणामी, हंगाम संपत आला असला तरी ३० ते ३५ टक्के मोसंबी अजूनही बागेत अडकून पडली आहे. हीच मोसंबी बाजारात आली तर दर आणखी ढासळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
दिल्ली, जयपूर, कानपूर, उत्तर प्रदेश या मुख्य बाजारांमध्ये तीव्र थंडी असल्याने मोसंबीची मागणी प्रचंड घटली आहे. यंदा शेतकऱ्यांना अवघे ३ ते १५ हजार रुपये टन इतकाच दर मिळत आहे. काळा मंगू, हवामान आणि घटलेली मागणी या तिहेरी संकटामुळे बागायतदार आर्थिकदृष्ट्या कोलमडले आहेत.
यावर्षी थंडीमुळे ९० टक्के मालाचे नुकसान झाले आहे. मागणी नाही, दर नाही. मृग बहाराज दर मिळू शकतो मात्र हा बहार लवकर अल्यास नुकसानच... - सतीश पाटील, मोसंबी विक्रेते.
३५ टक्के मोसंबी बागेतच आहे. बाजारात माल जास्त, पण मागणी नाही. गेल्या वर्षी २२ ते २६ हजार रुपये टन असा दर मिळला होता. यंदा निम्माही दर मिळत नाही. - मुकेश महाजन, मोसंबी, विक्रेते.
