करमाळा : तालुक्यात ऊस पिकाला पर्याय म्हणून केळी लागवडीकडे वळलेल्या शेतकऱ्यावर केळीचे भाव पडल्याने पश्चात्तापाची वेळ आली आहे.
बागेतील केळी काढणीला आली असताना बाजारात भाव नाही. त्यामुळे खरेदीदार व्यापारी गायब झाले आहेत. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
उसाचा दर व गाळपासाठी लागत असलेला उशीर यामुळे कंटाळलेल्या करमाळा तालुक्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी वेगळी वाट निवडत केळी लागवड करण्याचा निर्णय घेतला खरा; पण गेल्या तीन महिन्यांपासून केळीला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी रडकुंडीला आला आहे.
केळीची रोप खरेदी, लागवडीसाठी खताचा खर्च, मजुरी, औषधे, सिंचन अशा अनेक घटकांवर प्रचंड खर्च होतो. मात्र काढणीला आल्यानंतर चांगला भाव मिळेल व केलेल्या खर्चासह फायदा होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा असताना यंदा केळीचे दर कमालीचे कोसळले आहेत.
फक्त चार रुपये प्रतिकिलो दराने केळीची खरेदी केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला खर्चही निघेनासा झाला आहे. जे काही हातात येईल यावरच समाधान मानण्यास काही शेतकरी तयार असताना व केळी कापणीला आली असताना व्यापारीच गायब झाले आहेत.
अनेक दिवस मागे फिरूनही प्रतिसाद न मिळाल्याने शेतातील उभ्या खोडवा केळीच्या बागा रोटाव्हेटर फिरवून उखडून टाकण्याचा सपाटा शेतकऱ्यांनी आता लावला आहे.
उत्पादन मोठे; भाव नाही..
◼️ करमाळा तालुक्यात २० हजार हेक्टरवर केळीचे पीक उभे आहे. शेतात पिकलेली पूर्णपणे तयार केळी बाजारभाव नसल्याने ते खराब होण्याची वेळ आल्याने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत.
◼️ दुसरीकडे काही व्यापारी मुद्दाम तांत्रिक तूट निर्माण करून भाव पाडत आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला माल मातीमोल भावात विकावा लागत आहे.
इराण बाजारातील घडामोडी : भारतीय केळीला फटका
पाकिस्तानकडून केळीची आवक कमी झाल्यानंतर काही दिवस भारतीय केळीला इराण बाजारात वाढती मागणी होती. मात्र सध्या इक्वेडोर आणि फिलीपाईन्स येथून मोठ्या प्रमाणात केळीची आयात होत असल्याने भारतीय केळीच्या मागणीत घट झाली.
दोन एकरमध्ये तीन हजार खोड केळी लागवड केली होती. लाखो रुपये खर्च केला. केळी कापणीस आल्यावर व्यापारी ३ ते ४ रुपये किलो दराने केळीची मागणी होत आहे. कवडीमोल भाव देऊन व्यापारी खरेदीस येत नसल्याने केळी शेतातच पिकली. त्यामुळे खर्च वाया गेला दुसऱ्या पिकातून तरी उत्पन्न मिळाले असते. - राजेंद्र मेरगळ, शेतकरी, हिवरवाडी
सध्या निर्यातक्षम दर्जेदार भारतीय केळीला कमाल १८ रुपये दर मिळत आहे. दर कमी असल्याने निर्यातक्षम नवती केळी ही निर्यातक्षम खोडवा केळीच्या इतक्या कमी दरात मिळत आहे. यामुळे अनेक कंपन्यांनी अशा केळ्यांच्या खरेदीपासून हात आखडता घेतला आहे. परिणामी पुणे-मुंबई बाजारात मोठ्या प्रमाणात केळीचा माल पाठवावा लागत असून आवक वाढल्याने दरातही घसरण झाली आहे. इराणमधील खरेदीदारांच्या मते, ३१ डिसेंबरनंतर दरात सुधारणा होण्याची शक्यता आहे. - सनी इंगळे, केळी निर्यातदार, फलटण
अधिक वाचा: राज्यात १७४ साखर कारखाने सुरू; कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक गाळप? यंदा साखर उताऱ्यात कोण पुढे?
