गेल्या काही महिन्यांपासून संकटात सापडलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. इराण-अमेरिका संघर्षाच्या छायेतून केळीबाजार सावरला असून, अवघ्या महिनाभरात केळीच्या दरात तब्बल १४०० ते १५०० रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात ४०० ते ५०० रुपयांवर आलेली केळी आता १७०० ते २१०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचली आहेत.
मार्च महिन्यात इराण-अमेरिका युद्धजन्य परिस्थितीमुळे अरब राष्ट्रांमधील निर्यात पूर्णपणे ठप्प झाली होती. यामुळे सुमारे ५ हजार केळीचे कंटेनर खराब झाले होते, ज्याचा मोठा फटका व्यापारी आणि शेतकरी दोघांनाही बसला होता. मात्र, आता युद्धविराम झाल्याने निर्यात पुन्हा पूर्ववत झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढल्याने त्याचा थेट सकारात्मक परिणाम स्थानिक बाजारपेठेतील दरांवर दिसून येत आहे.
सध्या जळगाव बाजारपेठेत दर्जेदार केळीला २१०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. एकीकडे केळीला मागणी वाढत असली, तरी कडक उन्हामुळे आवक मात्र काहीशी कमी झाली आहे. केळीची मागणी मात्र कायम आहे. व्यापाऱ्यांच्या मते, ही तेजी पुढील किमान महिनाभर टिकून राहण्याची शक्यता आहे.
गेल्या महिन्यात निर्यातीअभावी आमचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. मात्र, आता दरात झालेली सुधारणा पाहता शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे. चांगल्या प्रतीच्या मालाला सध्या योग्य भाव मिळत आहे. - डॉ. सत्वशील पाटील, केळी उत्पादक जळगाव.
निर्यात सुरू झाल्याने बाजारपेठेत चैतन्य आले आहे. पाच हजार कंटेनर खराब झाल्याने व्यापाऱ्यांनी मोठी झळ सोसली होती. आता परिस्थिती सुधारत असून, केळीचा उठावही चांगला आहे. आगामी काही दिवस दर टिकून राहतील, अशी अपेक्षा आहे.- अशोक जाधव, केळी व्यापारी, जळगाव.
हेही वाचा : पांढरेशुभ्र दूध सुद्धा आरोग्याला ठरू शकतं धोकादायक? जाणून घ्या सविस्तर
