नामदेव मोरे
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अधिकारी, कर्मचारी निवृत्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. काही वर्षात ९३० पैकी ६०९ कर्मचारी निवृत्त झाले आहेत.
सद्यःस्थितीमध्ये ३२१ कर्मचारीच शिल्लक राहिले आहेत. ६५ टक्के कर्मचारी निवृत्त झाले असून, त्याचा परिणाम कामकाजावर होऊ लागला आहे. पाच उपसचिवांपैकी दोन शासनाकडून मागविले असून, एका ठिकाणी पदोन्नतीने पद भरती केले आहे.
राज्यातील ३०५ बाजार समित्यांची शिखर संस्था, वर्षाला १० हजार कोटी रुपयांची उलाढाल. १०० कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या मुंबई बाजार समितीला कुशल मनुष्यबळाची कमतरता जाणवू लागली आहे.
१५ ऑगस्ट १९७७ ला स्थापन झालेल्या या संस्थेमध्ये सफाई कामगारांसह १,३०० कामगार होते. यानंतर, सफाई काम ठेकेदारांकडून करून घेण्यास सुरुवात केल्यानंतर ९३० कर्मचारी उपलब्ध होते.
नवी मुंबईमधील पाच मार्केट, ठाणा मार्केट, तेल, ऊस व केळी मार्केटचे कामकाज बाजार समितीच्या माध्यमातून सुरू होते. प्रत्येक मार्केटला एक उपसचिव, दोन सहसचिव आणि सचिव अशी अधिकाऱ्यांची रचना होती.
मागील दहा वर्षात अधिकारी, कर्मचारी निवृत्त होऊ लागले आहेत. कायद्याचे उत्तम ज्ञान असणारे उपसचिव, सहसचिवांसह इतर कर्मचारीही निवृत्त होऊ लागले आहेत.
बाजार समितीमधील अधिकाऱ्यांची वेळेत पदोन्नती केली नाही, यामुळे सद्यस्थितीमध्ये संस्थेकडेही एकही अनुभवी उपसचिव नाही.
६५ टक्के कर्मचारी निवृत्त झाले असून, त्याचा परिणाम कामकाजावर होऊ लागला आहे. पाच उपसचिवांपैकी दोन शासनाकडून मागविले असून, एका ठिकाणी पदोन्नतीने पद भरती केले आहे.
दोन उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती
◼️ शासनाकडून दोन उपसचिव दर्जाचे अधिकारी आले आहेत. उरलेल्या मार्केटची कामे इतर कर्मचाऱ्यांकडून करून घेतले जात आहेत.
◼️ पुरेसे व कुशल मनुष्यबळ नसल्यामुळे बाजार समितीच्या कामकाजावर परिणाम होत असून, अशीच स्थिती राहिली, तर अजून काही वर्षांनी मार्केट चालविणे जिकिरीचे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रिक्त पदांवर भरतीची मागणी होत आहे.
कामाचे ऑडिट व्हावे
◼️ बाजार समितीमध्ये काही कर्मचारी मनापासून काम करतात. काही कर्मचारी अजिबात काम करत नाहीत.
◼️ अनेकांनी गेट, नाके अशा ठिकाणीच कामे केली आहेत. प्रशासन, नियमन शाखेत काम करण्याची इच्छा नसते.
◼️ काही कर्मचाऱ्यांकडे कोणतीच महत्त्वाची जबाबदारी नाही. यामुळे सर्वांच्या कामाचे ऑडिट व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे
मार्केटनिहाय २०२४-२५ची बाजार फी
कांदा-बटाटा मार्केट - १४.८ कोटी
मसाला मार्केट - २१.६२ कोटी
धान्य मार्केट - २८.३० कोटी
भाजी मार्केट - १०.१४ कोटी
फळ मार्केट - ८.८० कोटी
मार्केट एकूण गाळे
मसाला मार्केट - ६६०
धान्य मार्केट - ४१२
भाजी व फळ - १,०२९
कांदा - २४३
बाजार समितीमधील रखडलेली पदोन्नतीचा विषय मार्गी लावला आहे. अनुकंपा तत्त्वावरील कर्मचाऱ्यांची नियुक्तीही केली आहे. नवीन मनुष्यबळाची गरज लागणार आहे. भविष्यात याविषयी योग्य निर्णय घेतला जाईल. - पी.एल. खंडागळे, सचिव एपीएमसी
अधिक वाचा: उसाचा काटा आता नाही करणार शेतकऱ्यांचा घाटा; काटामारीवर सरकारी शिक्कामोर्तब