पुणे : अंजीरचा हंगाम सुरू झाल्याने हातगाडीपासून स्टॉलपर्यंत बाजारात सर्वत्र हे फळ दिसू लागले आहे
मात्र, हंगामाच्या सुरुवातीला पावसाचा तडाखा, त्यानंतर सुरू झालेल्या थंडीमुळे फळाच्या उत्पादनासह त्याच्या दर्जावरही परिणाम झाला आहे.
लहरी हवामानामुळे बाजारात अद्याप अंजीराची अपेक्षित आवक होत नसल्याचे चित्र आहे. मात्र, मागणी चांगली असल्याने दर्जानुसार अंजीरला किलोला ४० ते १८० रुपयांपर्यत दर मिळत असल्याचे चित्र आहे.
ऑक्टोबर महिन्यापासून पुरंदरच्या अंजीराचा हंगाम सुरू होतो. येथील सोनोरी, भिवरी आदी भागांतून मोठ्या प्रमाणात अंजीर गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात दाखल होते.
यंदा हंगामाच्या सुरुवातीला पावसाचा तडाखा बसल्याने फळे मोठ्या प्रमाणात खराब झाली तर त्यानंतर थंडीचा कडाका वाढल्याने उत्पादनात घट झाली.
दररोज एक टन अंजीर
सध्या पुणे येथील बाजारात दररोज एक टन अंजीर दाखल होत आहे. घाऊक बाजारात त्याला किलोला ४० ते १३० रुपये, तर दर्जेदार मालाला १८० रुपयांपर्यंत दर भाव मिळत आहे.
सध्या आवक कमी आणि दर जास्त असले तरी दर्जा पाहता एरवीच्या तुलनेत दर टिकून आहेत. थंडी काहीशी कमी झाल्यानंतर आवक वाढून अंजीरचे दर खाली येतील. त्यानंतर, गुजरातसह विविध राज्यांतून अंजीरला मागणी वाढेल. - ओंकार वागसकर, अंजीरचे व्यापारी, मार्केट यार्ड
अधिक वाचा: थंडीत मुळा का खावा? त्याचे शरीराला कसे होतात फायदे? जाणून घ्या सविस्तर
