करमाळा : महाराष्ट्रातील सर्वांत जास्त केळीची निर्यात होत असलेल्या जळगाव जिल्ह्यालाही मागे टाकत उजनी लाभक्षेत्रातील केळी पिकाने विक्रम केला आहे.
करमाळा, माढा, माळशिरस, पंढरपूर तालुक्यातील तसेच पुणे जिल्ह्यातील इंदापूर, कर्जत, अहिल्यानगर येथील शेतकऱ्यांनी सर्वाधिक केळी निर्यात करण्याचा विक्रम केला आहे.
विशिष्ट चव व जास्त दिवस टिकण्याची गुणवत्ता ही येथील केळीची खास वैशिष्ट्ये असल्यामुळे भौगोलिक जी.आय मानांकन (जिओग्राफिकल इंडेक्स) मिळावे, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
उजनी लाभक्षेत्रातील केळीला जळगाव जिल्ह्यातील केळीपेक्षा नैसर्गिक परिस्थिती केळी उत्पादनासाठी अधिक अनुकूल असल्याने येथे संपूर्ण वर्षभर केळीची लागवड व उत्पादन शक्य होत असल्यामुळे 'उजनी'ची केळी म्हणूनच जी. आय. मानांकन मिळाले पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, माळशिरस तसेच पुणे जिल्ह्यातील इंदापूर व अहिल्यानगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील उजनी लाभक्षेत्रातील केळी उत्पादन व निर्यातीचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जात आहेत.
करमाळा तालुक्यातील कंदर, वाशिंबे व माढा तालुक्यातील टेंभुर्णी, अहिल्यानगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील खेड ही गावे विशेषतः निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध झाली आहेत.
यामुळेच देशातील प्रमुख केळी निर्यातदार कंपन्यांनी या भागात आपली कार्यालये स्थापन केली आहेत. ही गावे मोठ्या प्रमाणावर केळी निर्यात करत इतर गावांतील शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरत असून त्यांची विशेष ओळख निर्माण झाली आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पॅकिंग आणि आंतरराष्ट्रीय निकषांनुसार केळी प्रक्रिया यामुळे टेंभुर्णी, कंदर व वाशिंबे येथील केळी जागतिक स्तरावर पोहोचत आहेत.
उजनी परिसर भारताच्या केळी निर्यात क्षेत्रातील प्रमुख केंद्र ठरले आहे. जी.आय. मानांकन मिळाल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रेडिंग होण्यास मदत होणार आहे.
उजनी लाभक्षेत्रातील नैसर्गिक परिस्थिती केळी उत्पादनासाठी अधिक अनुकूल असल्याने येथे संपूर्ण वर्षभर केळीची लागवड होत असते. तसेच महाराष्ट्रातून एकूण निर्यात होणाऱ्या केळीपैकी ६५ टक्के केळी याच परिसरातून निर्यात केली जाते. त्यामुळे सर्वाधिक परकीय चलन याच परिसरातून मिळत आहे. भौगोलिक चिन्हांकन मिळणे आवश्यक आहे. - गणेश झोळ, केळी उत्पादक, वाशिंबे
अधिक वाचा: करमाळा बनतोय केळीचं हब; लाल, निळ्या अन् वेलची केळीसाठी सोलापूर गाजतंय जगभर