चंद्रकांत कित्तुरे
कोल्हापूर : आगामी २०२६-२७ च्या हंगामात उसाची एफआरपी वाढवण्यासाठीची प्रक्रिया २९ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे.
केंद्रीय कृषिमूल्य आयोगाने २९ ऑक्टोबर रोजी देशातील सर्व साखर उत्पादक राज्यांच्या साखर आयुक्तांची बैठक बोलावली आहे.
३० ऑक्टोबर रोजी साखर कारखानदारांच्या संघटनांशी तर ३१ ऑक्टोबर रोजी शेतकरी संघटनांशी कृषिमूल्य आयोग यासंदर्भात चर्चा करणार आहे.
२०२५-२६ च्या हंगामासाठी १०.२५ साखर उतारा असलेल्या उसाला प्रति टन ३५५० रुपये एफआरपी मिळणार आहे. त्यापुढील प्रत्येक टक्क्याला ३५५ रुपये जादा मिळणार आहेत.
केंद्र सरकारने ३० एप्रिल २०२५ रोजी हा आदेश जारी केला होता. कृषिमूल्य आयोग सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून एफआरपी वाढीची शिफारस केंद्र सरकारला करत असतो.
त्यावर केंद्र सरकार निर्णय घेऊन अध्यादेश जारी करत असते. त्यानुसार आगामी वर्षात एफआरपी किती असावी, हे ठरवण्याची प्रक्रिया २९ ऑक्टोबरपासून सुरू करत आहे.
हरयाणात उसाला देशातील सर्वाधिक दर
◼️ हरयाणा सरकारने उसाला प्रति टन ४१५० रुपये दर देण्याची घोषणा करून राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळी भेट दिली आहे.
◼️ देशातील हा सर्वाधिक दर असल्याचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांनी रविवारी सांगितले.
◼️ सुरू उसाचा दर ४००० वरून ४१५९ तर उशिरा येणाऱ्या (आडसाली) उसाचा दर ३९३० वरून ४०८० रुपये करण्यात येत असल्याची घोषणा सैनी यांनी केली आहे.
◼️ हरयाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि बिहार ही चार राज्ये उसाला राज्याचा दर जाहीर करत असतात.
आगामी हंगामातील एफआरपी वाढीसंदर्भात चर्चा करण्यासाठी कृषिमूल्य आयोगाने साखर कारखानदारांच्या संघटनांसोबत ३० ऑक्टोबर रोजी बैठक बोलावली आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ या बैठकीत आपले म्हणणे मांडेल. - प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय साखर कारखाना महासंघ
अधिक वाचा: बॉयलर पेटला, १७ साखर कारखाने सुरू होणार; गाळप जवळ कारखानदार दर कधी जाहीर करणार?
