उल्का तावडे
उन्हामुळे होणारी अंगाची लाहीलाही, अंगावर येणारा घाम, घशाला कोरड पडून वारंवार लागणारी तहान यामुळे उन्हाळ्यात सर्वच जण हैराण होतात. उन्हाळ्यात भूकही कमी झालेली असते. जास्तीत जास्त पाणीच प्यावे असे वाटते. पण आहार तर घेतलाच पाहिजे.
अन्यथा थकवा येऊन आरोग्य बिघडण्याची शक्यता अधिक असते. कारण, सूर्याची उष्णता जसजशी वाढत जाते, तसे आपल्या शरीरातील पाण्याचा अंश कमी होतो.
अशक्तपणा, थकवा वाढतो, घामावाटे पोषक द्रव्ये शरीराबाहेर निघून जातात. त्यामुळे उन्हाळ्यात शरीराचे संतुलन राखण्यासाठी योग्य आहार घेणे गरजेचे असते. तसेच रसदार फळे, पाणी, शहाळ्याचे पाणी, ताक यांचेही सेवन करणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र अति मसालेदार पदार्थ, तेलकट, मांसाहार टाळलेलेच बरे.
सध्या उष्म्यात प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे दुपारच्या वेळी घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. मात्र नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने काहींना घराबाहेर पडावेच लागते, अशावेळी घराबाहेर पडताना नेहमी पाण्याची बाटली जवळ ठेवणे फायदेशीर ठरते.
उन्हाळ्यामध्ये पचनशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे आहाराचे योग्य प्रकारे पचन होण्यासाठी पचनास हलका आहार घ्यावा, तसेच घेतलेला आहार सहज पचण्यासाठी २ ते ३ वेळा थोडा थोडासा घ्यावा. एकाचवेळी भरपेट जेवणे उन्हाळ्यात टाळावे. या दिवसामध्ये आपल्या शरीरात पाण्याची कमतरता जाणवते.
पाण्याची कमतरता भासली की, मग डिहायड्रेशनचा त्रास संभवतो. अशा परिस्थितीमध्ये पचन, सुलभकरण्यासाठी संतुलन राखण्यासाठी, तापमानावर मात करण्यासाठी जेवणात रसदार फळे आणि भाज्यांचा समावेश करणे महत्त्वाचे आहे.
या ऋतूमध्ये विशेषतः हंगामी फळांचे सेवन केल्याने शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. तसेच उन्हाळ्यात होणाऱ्या आजारांपासून ही बचाव होतो. असा सल्ला तज्ज्ञ देतात.
शीतपेय, ताक, दही फायदेशीर
शरीरातील पाण्याची पूर्तता करण्यासाठी विविध आरोग्यदायी पेये जसे कोकम सरबत, लिंबू सरबत, आवळा सरबत, शहाळाचे पाणी, उसाचा रस, विविध फळांचे रस, ताक, लस्सी, नाचण्याचे अंबिल इ. पेयांचे उन्हाळ्यामध्ये सेवन करणे चांगले असते. तसेच दूध, दही, ताक, लस्सी, तुप यांचा वापर आहारामध्ये करावा,
कोल्ड्रिंक्स अपायकारक
बाजारात असणारी विविध शीतपेये (कोल्ड्रिंक्स) ही उन्हाळ्याच्या दिवसात थंडावा देत असली तरीही ती शरीराला अपायकारकच असतात. यासाठी अशा कोल्ड्रिक्सपासून दूरच राहणे गरजेचे असते. याशिवाय उन्हाळ्यात चहा, कॉफी यासारखी पेये सुद्धा कमी प्रमाणातचं प्यावीत.
मसालेदार पदार्थ टाळणे हिताचे
उन्हाळ्यामध्ये आहारात मसाल्यांचा वापर अत्यंत कमी प्रमाणातच करावा. मुळात मसाले हे उष्ण गुणाचे असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात मसाले अतिप्रमाणात वापरणे टाळावे, तसेच तेलकट पदार्थही टाळणे चांगले.
मांसाहार अल्प प्रमाणातच
उन्हाळ्यामध्ये जाठराग्नी मंद असल्याने पचनास जड असणारे मांसाहारी पदार्थ अल्प प्रमाणामध्येच सेवन करणे हिताचे असते. मांसाहारामध्ये मसाल्यांचा अतिवापर करणे टाळावे. अति मसालेदार, तेलकट पदार्थ टाळणे गरजेचे आहे.
या दिवसात खरबूज, कलिंगड, संत्री, मोसंबी, द्राक्षे, अननस, काकडी, पपई आदी फळांचा समावेश आहारात करणे फायदेशीर ठरते. उन्हाळ्यात पुरेसे पाणी प्यावे. कारण उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असते यासाठी पुरेसे पाणी पिणे आवश्यक असते. शरीराला पुरेसे पाणी न मिळाल्यास डिहायड्रेशनची स्थिती होऊ शकते यासाठी दिवसभरात पुरेसे म्हणजे ८ ते १० ग्लास पाणी प्यावे. उन्हाळ्यात माठात ठेवलेले पाणी प्यावे. मात्र फ्रिज मधील थंडगार पाणी पिणे घातक ठरू शकते. आहारात विविध पालेभाज्यांचा आहारात समावेश असावा. याशिवाय काकडी, गाजर, बीट आणि कांद्याचे कोशिंबीर आहारात ठेवावे. - डॉ. रोहन राठोड.
हेही वाचा : अबब किती हे फायदे; ताकाचे आरोग्यदायी फायदे वाचल्यावर तुम्ही देखील हेच म्हणाल..