पुणे : मालमत्ता खरेदी-विक्री करणाऱ्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातर्फे आता मालमत्तांचे मूल्य निर्धारण करण्याची प्रक्रिया ऑनलाइन केली जाणार आहे.
यामुळे जमिनीचे/घराचे मूल्यांकन करण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत.
आता २४ तासांत मिळणार 'व्हॅल्युएशन'
◼️ नवीन ऑनलाइन सुविधेमुळे आता घरबसल्या मालमत्तेचे मूल्य किती आहे, हे नागरिकांना कळणार आहे.
◼️ यासाठी केवळ जागेचे क्षेत्रफळ आणि सर्व्हे क्रमांक पोर्टलवर टाकून ऑनलाइन शुल्क भरावे लागेल.
◼️ शुल्क भरल्यानंतर अवघ्या दुसऱ्या दिवशी संबंधित जागेचे व्हॅल्युएशन नागरिकांना प्राप्त होईल.
◼️ विशेष म्हणजे, हे मूल्य निर्धारण दुय्यम निबंधकांच्या डिजिटल स्वाक्षरीत मिळणार असल्याने ते सर्व कायदेशीर कामांसाठी ग्राह्य धरले जाणार आहे.
मग काय होती जुनी पद्धत?
◼️ आतापर्यंत एखाद्या खरेदीदाराला जागा खरेदी करायची असल्यास, त्या जागेचे कागदपत्रे आणि सर्व्हे क्रमांक घेऊन नोंदणी विभागात जावे लागत असे. तिथे प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन 'ग्रास' प्रणालीवर पैसे भरावे लागत.
◼️ या पैशांची पावती संबंधित कार्यालयात जमा केल्यावर, अधिकारी त्याची पडताळणी करत आणि त्यानंतर त्या कागदपत्रावर शिक्का मारून मूल्य निर्धारण केले जात असे.
◼️ या संपूर्ण प्रक्रियेसाठी किमान तीन ते चार दिवसांचा अवधी लागत होता आणि नागरिकांना वारंवार कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत होत्या. या सर्व अडथळ्यांमधून सर्वसामान्यांची सुटका होणार आहे.
नागरिकांना होणारे फायदे
◼️ ३-४ दिवसांचे काम आता एका दिवसात होईल.
◼️ मानवी हस्तक्षेप कमी झाल्याने भ्रष्टाचाराला आळा बसेल.
◼️ कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची आणि रांगेत उभे राहण्याची गरज उरणार नाही.
ही प्रक्रिया सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. येत्या महिनाभरात ही सुविधा संपूर्ण राज्यभरात लागू करण्याचा आमचा निर्धार आहे. यामुळे नागरिकांचा वेळ वाचेल आणि पारदर्शकता वाढेल. - अभयसिंह मोहिते, नोंदणी उपमहानिरीक्षक, पुणे
अधिक वाचा: कर्जमाफीच्या याद्या तयार; शेतकऱ्यांना 'या' बँकांकडून मिळणार सर्वाधिक कर्जमाफीचा लाभ
