मागील वर्षापेक्षा यंदा सुरू होणाऱ्या साखर कारखान्यांची संख्या कमी असली तरी तुलनेत या वर्षी दोन कोटी टन ऊस गाळप अधिक झाले आहे. एकूण गाळपात सोलापूर जिल्ह्याचा वाटा एक कोटी टनापेक्षा अधिक आहे.
राज्यात यंदा उशिरापर्यंत पाऊस पडत होता. त्यामुळे राज्याचा ऊस गाळप १ नोव्हेंबरपासून सुरू झाला. नोव्हेंबर महिन्यात पाऊस व पाण्यामुळे ऊसतोडणीसाठी व्यत्यय आला. परिणामतः साखर कारखाने सुरू होण्यासाठी उशीर झाला. असे असले तरी राज्यात सध्या १९६ साखर कारखाने सुरू आहेत. मागील वर्षी याच कालावधीत १९९ साखर कारखाने सुरू होते. म्हणजे मागील वर्षापेक्षा यंदा तीन साखर कारखाने कमी सुरू झाले आहेत.
मागच्या वर्षापेक्षा यंदा तीन साखर कारखाने कमी सुरू झाले असले तरी ऊसगाळप मात्र यंदा दोन कोटी टनाने अधिक आहे. याचा अर्थ यंदा सुरू झालेले साखर कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू असल्याचे दिसत आहे. नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यात तब्बल राज्यात दोन कोटी टन ऊस गाळप अधिक झाल्याने गाळपाचा वेग वाढला आहे. यंदा आतापर्यंत झालेल्या ऊसगाळपात एकट्या सोलापूर जिल्ह्याचा वाटा एक कोटी टन आहे.
कोणत्या जिल्ह्याचा किती साखर उतारा!
• सोलापूर जिल्ह्यात ३३ साखर कारखान्यांचे १ कोटी ३ लाख टन ऊस गाळप झाले आहे. तसेच ३६ साखर कारखाने सुरू असले तर लोकशक्ती औराद, मातोश्री अक्कलकोट, गोकुळ शुगर धोत्री यांची ऊसगाळपाची नोंद झाली नाही. उर्वरित ३३ साखर कारखान्यांचे ऊस गाळप १ कोटी ३ लाख मेट्रिक टन इतके झाले आहे. साखरउतारा ८.३७ टक्क्यांपर्यंत पडला आहे.
• सोलापूरनंतर कोल्हापूर जिल्ह्यात ८४ लाख टन ऊस गाळप झाले आहे. साखरउतारा मात्र राज्यात सर्वाधिक १०.६५ टक्के इतका आहे. गाळपात मागे (५२ लाख टन) असलेल्या सांगली जिल्ह्याचा साखरउतारा १०.१२ टक्के आहे. तसेच ७३ लाख टन ऊसगाळप असलेल्या पुणे जिल्ह्याचा साखरउतारा ९ टक्क्यांपर्यंत, तर ७१ लाख टन गाळप झालेल्या अहिल्यानगर जिल्ह्याचा साखरउतारा ८.२७ टक्के इतका आहे.
हेही वाचा : कमी पाण्यात भरघोस उत्पादन देणाऱ्या सूर्यफुलाची लागवड ठरेल यंदा फायद्याची; वाचा सविस्तर
