अरुण बारसकर
सोलापूर : मागील वर्षी राज्यात व जिल्ह्यात पावसाच्या पडलेल्या खंडाचा यंदाच्या ऊस गाळपावर मोठा परिणाम झाला आहे.
शेतकऱ्यांना ऊस गाळपातून मिळणाऱ्या रकमेलाही १५ हजार कोटी रुपयांचा फटका बसल्याचे दिसत आहे. साखर कारखाने, ऊस तोडणी यंत्रणा तसेच शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
महाराष्ट्रातील साखर उद्योगाचा देशभरात डंका आहे. मात्र, यावर्षी तशी परिस्थिती राहिली नसल्याचे दिसत आहे. कारण जानेवारी २०२४ पासून उन्हाचा कडाका सुरू झाला होता.
अगोदरच पाऊस कमी पडल्याने पाण्याअभावी ऊस क्षेत्र कमी झाले होते. कडक उन्हाळ्याच्या चटक्याने उसाच्या वाढीवर कमालीचा परिणाम झाला होता.
अधिक वाचा: शेतजमिनीचे वाद होणार आता कमी, जमीन मोजणी प्रक्रियेमध्ये हे मोठे बदल; वाचा सविस्तर
मात्र, २०२४ च्या जून महिन्यात सुरुवातीपासूनच पावसाला सुरुवात झाली. मात्र, सतत चार महिन्यांपेक्षा अधिक दिवस जोराचा पाऊस पडत राहिल्याने उसाची वाढ खुंटल्याचे सांगण्यात येते.
अगोदरच ऊस क्षेत्र कमी व त्याही क्षेत्राची पुरेशी वाढ न झाल्याने वजनात मोठी घट झालेली दिसली. त्यामुळेच सरलेल्या हंगामात एकरी उतारा कमी पडल्याने राज्यातच ऊस उत्पादक, ऊस तोडणी यंत्रणा तसेच साखर कारखान्यांना मोठा फटका बसला आहे.
जसा ऊस उत्पादकांना आर्थिक फटका बसला तसेच ऊस तोडणी यंत्रणेलाही पुरेसे काम मिळाले नसल्याने म्हणावा तितका रोजगार मिळाला नाही.
राज्यातील गाळप मेट्रिक टन व रक्कम (कोटीत)
वर्ष | गाळप | रक्कम |
२०२०-२१ | १०१३.६४ | ३२,१४५ |
२०२१-२२ | १३२१.०५ | ४३,३१३ |
२०२२-२३ | १०५२.८८ | ३५,५३१ |
२०२३-२४ | १०७३.०८ | ३६,७५८ |
२०२४-२५ | ८४७.७९ | २१,०४३ |
कमी व अधिक पाऊस पडल्याने ऊस उत्पादनावर सर्वाधिक फटका सोलापूर व धाराशिव जिल्हाला बसल्याचे दिसत आहे. ऊस गाळप फारच कमी झाल्याने पैसाही कमीच मिळाला.