अवसरी : दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु, येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने २०२४-२५ गाळप हंगामात ११,३८,४९६ मेट्रिक टन ऊस गाळप केला.
उसासाठी प्रति मेट्रिक टन १७५ रुपये प्रमाणे एकूण १९ कोटी ९२ लाख ३६ हजार रुपयांची रक्कम सोमवार (२९ सप्टेंबर २०२५) रोजी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे. ही माहिती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
कारखान्याचे संस्थापक-संचालक आणि महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री आमदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार, २०२४-२५ गाळप हंगामासाठी प्रति मेट्रिक टन ३,२९० रुपये अंतिम ऊस दर जाहीर केला आहे.
यापैकी एफ.आर.पी.प्रमाणे ३,०८० रुपये प्रति मेट्रिक टन आधीच अदा करण्यात आले असून, उर्वरित २१० रुपये प्रति मेट्रिक टन रकमेतून खालील निधी वजा केले आहेत.
शिक्षण संस्था निधी (१० रुपये प्रति मेट्रिक टन) आणि भाग विकास निधी (२५ रुपये प्रति मेट्रिक टन) वजा करून शिल्लक १७५ रुपये प्रति मेट्रिक टनाप्रमाणे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.
दीपावलीपूर्वी अंतिम हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करून कारखान्याने दिलेला शब्द पूर्ण केला आहे. यामुळे रब्बी हंगामासाठी सोसायटी रकमेचा भरणा करण्यास शेतकऱ्यांना मदत होणार आहे.
कारखान्याने नेहमीप्रमाणे एफ.आर.पी.ची रक्कम वेळेत अदा केली असून, याव्यतिरिक्त वाढीव रक्कम कपातीनंतर १७५ रुपये प्रति मेट्रिक टन अंतिम हप्त्याच्या स्वरूपात दिली आहे. तसेच, लवकरच साखर वाटपाची प्रक्रियाही पूर्ण केली जाणार आहे.
२०२५-२६ गाळप हंगामासाठी कारखान्याने तयारी पूर्ण केली आहे. मशिनरीचे ओव्हरहॉलिंग पूर्ण झाले असून, ऊस तोडणी आणि वाहतुकीसाठी आवश्यक यंत्रणेचे करार करून डव्हान्स रक्कम अदा करण्यात आली आहे.
संपूर्ण उसाचे वेळेत गाळप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांनी कार्यक्षेत्र आणि परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना भीमाशंकर कारखान्याला ऊस देऊन पूर्वीप्रमाणे सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
अधिक वाचा: दसऱ्याला गव्हाणीत मोळी टाकण्याची तयारी पूर्ण; यंदा गाळप मात्र दिवाळीनंतरच गती घेणार