राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पवनार (वर्धा) ते पत्रादेवी (सिंधुदुर्ग) शक्तीपीठ महामार्गाच्या कामाला आता वेग आला आहे. या मार्गाच्या मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
ऑगस्ट महिन्यात राज्य सरकारने सांगलीपर्यतच्या आखणीस आणि भूसंपादनास मान्यता दिली होती. त्यानुसार आत्तापर्यंत १५० पेक्षा जास्त गावांमधील जमिनी मोजणीचे काम यशस्वीरित्या पार पडले आहे.
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी प्रशासनाने २०७८७ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून उर्वरित तांत्रिक कामेही पूर्णत्वास येत आहेत.
हा महामार्ग राज्यातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, सोलापूर व कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग अशा एकूण १२ जिल्ह्यांतील ३९ तालुके आणि ३७० गावांमधून जाणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, करवीर, कागल यासारख्या तालुक्याच्या आखणीची अधिसूचना यापूर्वीच रद्द करण्यात आली होती. मात्र आत्ता नवीन बदलासह हा प्रकल्प भूसंपादनाच्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.
१८ धार्मिक स्थळांना महामार्ग जोडणार
◼️ या महामार्गाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही राज्यातील तीन प्रमुख शक्तीपीठे माहूर, तुळजापूर आणि कोल्हापूर यांना एकमेकांशी जोडणार आहेत.
◼️ याव्यतिरिक्त परळी वैजनाथ, औंढा नागनाथ, पंढरपूर आणि नरसोबाची वाडी यांसारख्या एकूण १८ धार्मिक स्थळांना हा महामार्ग जोडणार आहे. राज्यात धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.
महामार्गाच्या आराखड्यात महत्त्वपूर्ण बदल
◼️ या महामार्गाच्या आराखड्यात काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.
◼️ सातारा जिल्ह्यातील काही भाग यात नव्याने समावेश झाला आहे.
◼️ तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातून हा महामार्ग वळवण्यात आल्यामुळे महामार्गाची एकूण लांबी आता ४०८ किलोमीटरवरून वाढवून ४४० किलोमीटरपर्यंत पोहोचली आहे.
अधिक वाचा: राज्यात ‘या’ प्रकारातील लाभार्थ्यांचे रेशनकार्ड होणार आता रद्द; पुरवठा विभागाची नवी मोहीम सुरु
