अरुण बारसकर
सोलापूर : राज्यात साखर हंगामाने वेग घेतला असून, १९५ कारखान्यांचे ५६२ लाख मेट्रिक टन ऊस गाळप झाले आहे.
राज्यात सर्वाधिक ९३ लाख मेट्रिक टन गाळप सोलापूर जिल्ह्याचे झाले आहे. राज्यात गाळपात आघाडीवर असलेला सोलापूर जिल्हा साखर उताऱ्यात मात्र मागे आहे.
राज्याचा साखर हंगाम सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी झाला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीचे काही दिवस पावसाच्या पाण्याचा ऊस तोडणीसाठी अडथळा आला होता. मात्र, दीड महिन्यापासून ऊस गाळप वेगाने सुरू आहे.
राज्यात सध्या सहकारी ९७ व खासगी ९८, असे १९५ साखर कारखाने सुरू आहेत. यंदा ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याने, तसेच तोडणी वाहतूक यंत्रणा पुरेशी असल्याने ऊस गाळपाचा वेग वाढला आहे.
दोन महिन्यांत राज्याचे ऊस गाळप ५६२ लाख मेट्रिक टन इतके झाले आहे. दोन महिन्यांत ४९२ लाख क्विंटल साखर तयार झाली, तर साखर उतारा ८.७५ टक्के इतका पडला आहे.
ऊस गाळपात सोलापूर जिल्ह्याची आघाडी असून, दोन महिन्यांत ९३ लाख मेट्रिक टन गाळप झाले आहे.
इतर जिल्हाच्या तुलनेत दुसऱ्या क्रमांकाचे गाळप झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यापेक्षा अठरा लाख मेट्रिक टन ऊस गाळप अधिक झाले आहे. साखर उतारा मात्र इतर जिल्ह्याच्या तुलनेत सोलापूरचा कमीच आहे.
३३ कारखान्यांत ५६२ मे. टन गाळप
◼️ सोलापूर जिल्ह्यात ओंकार (जुना मातोश्री लक्ष्मी शुगर), गोकुळ धोत्री व लोकशक्ती हे साखर कारखाने सुरू असले, तरी त्याची नोंद झालेली नाही. इतर ३३ साखर कारखान्यांत ५६२ लाख मेट्रिक टन ऊस गाळप झाला आहे.
◼️ सोलापूर नंतर कोल्हापूर जिल्ह्याचे ७६ लाख मेट्रिक टन, पुणे जिल्ह्याचे ऊस गाळप ६५ लाख, तर अहिल्यानगर चे ६२ लाख मेट्रिक टन ऊस गाळप झाले आहे.
◼️ कोल्हापूर जिल्ह्याची सरासरी साखर उतारा १०.५ टक्के, सांगली जिल्ह्याचा १०.४ टक्के, सातारा ९.१५ टक्के, पुणे जिल्ह्याचा उतारा ८.८९ टक्के, सोलापूर जिल्ह्याचा ८.२५ टक्के, तर अहिल्यानगरचा साखर उतारा ८.१२ टक्के इतका आहे.
अधिक वाचा: राज्यातील 'या' कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे राष्ट्रीयीकरण होणार; शेतकऱ्यांना कसा होणार फायदा?
