Join us

राज्यात 'हे' सात जिल्हे अजून तहानलेलेच; पाऊस न पडल्यास पिकांना मोठा फटका बसणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 12:24 IST

Rainfall in Maharashtra मे महिन्यात कोकणात झालेली अतिवृष्टी व पूर्व विदर्भात पावसाने उशिरा लावलेली हजेरी यामुळे भात रोपवाटिकांना फटका बसला आहे.

पुणे : मे महिन्यात कोकणात झालेली अतिवृष्टी व पूर्व विदर्भात पावसाने उशिरा लावलेली हजेरी यामुळे भात रोपवाटिकांना फटका बसला असून, परिणामी भंडारा, गोंदिया, गडचिरोली, रत्नागिरी व पालघर या जिल्ह्यांमध्ये अद्याप ४५ ते ७० टक्केच भात लागवड झाली आहे.

राज्यात आतापर्यंत एकूण क्षेत्राच्या ९२ टक्के अर्थात एक कोटी ३२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. बीड, लातूरसारख्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाची गरज असून, पुढील आठवड्यात समाधानकारक पाऊस न झाल्यास पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

राज्यात जुलै महिन्यात सरासरी ३३१ मिलिमीटर पाऊस पडतो. आतापर्यंत २७८.९ मिलिमीटर पाऊस पडला असून, सरासरीच्या हा पाऊस ८४ टक्के इतका आहे. जून व जुलै या दोन महिन्यांमध्ये एकूण ४८६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यात खरीप पिकांची पेरणी सरासरी एक कोटी ४४ लाख हेक्टरवर केली जाते. आतापर्यंत एक कोटी ३२ लाख हेक्टर अर्थात ९२ टक्के क्षेत्रावर खरीप पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत.

मे महिन्यात कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे भात रोपवाटिकांवर विपरीत परिणाम झाला. परिणामी शेतकऱ्यांना नव्याने रोपवाटिका तयार कराव्या लागल्या.

तीच स्थिती विदर्भातील पूर्व भागातही निर्माण झाली. रत्नागिरी जिल्ह्यात ५९, तर पालघर जिल्ह्यात ७१ टक्के भात लागवड झाली आहे. कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या मते पुढील आठवडाभरात भाताची पुनर्लागवड पूर्ण होईल.

दरम्यान, मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात खरीप पिकांची परिस्थिती चिंताजनक आहे. पावसाचे प्रमाण तुलनेने कमी असल्याने पुढील आठवड्याभरात पाऊस न झाल्यास पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.

लातूर जिल्ह्यातही पाऊस कमी असला, तरी गेल्या दोन दिवसांपासून हलका पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे.

जळगाव, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, संभाजीनगर या जिल्ह्यांमध्येही पावसाचे प्रमाण कमी असून, पिकांची स्थिती मात्र उत्तम आहे. उडीद, मूग ही पिके सध्या फुलोऱ्यात असून, पाऊस झाल्यास या पिकांचे उत्पादन चांगल्या रीतीने येऊ शकेल, असेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

कमी पेरणीचे जिल्हेभंडारा ४४ टक्के, गोंदिया ५१ टक्के, गडचिरोली ५६ टक्के, रत्नागिरी ५९ टक्के, पालघर ७१ टक्के.सर्वाधिक पेरणीचे जिल्हेसोलापूर १२१ टक्के, संभाजीनगर १०० टक्के, नांदेड ९९ टक्के, वर्धा ९९ टक्के, धुळे ९९ टक्के.

५४ तालुक्यांमध्ये ५० ते ७५ टक्के पावसाची नोंदकृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील सात तालुक्यांमध्ये अजूनही २५ ते ५० टक्केच पाऊस झाला आहे, तर ५४ तालुक्यांमध्ये ५० ते ७५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. तसेच ७५ ते १०० टक्के पाऊस १३६ जिल्ह्यांमध्ये व १५८ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.

पेरणी क्षेत्र५ वर्षांचे सरासरी क्षेत्र : १४४.३६ लाख हेक्टरगेल्या वर्षीची अंतिम पेरणी (२० सप्टेंबर २०२४ अखेर) : १४५.८२ लाख हेक्टरगेल्या वर्षीचा याच तारखेची पेरणी : १३५.४५ लाख हेक्टरयंदाची पेरणी : १३२.७७ लाख हेक्टर

पावसाचे कमी प्रमाण (आकडे टक्केवारीमध्ये)बीड - ८१.५८जळगाव - ७९.६३सोलापूर - ७९.४३कोल्हापूर - ७३.२८अहिल्यानगर - ७१.५२लातूर - ६९.५३नंदुरबार - ५५.७१

अधिक वाचा: Ranbhajya : जीवनसत्वाचा खजिना असणाऱ्या 'या' रानभाज्या खा अन् आजारापासून दूर रहा

टॅग्स :पेरणीमहाराष्ट्रशेतकरीशेतीपाऊससरकारराज्य सरकारसोलापूरकोकणविदर्भभातपीक