सोलापूर : सततच्या अतिवृष्टीचा फटका खरीप पिकांना बसला असला तरी यंदाच्या रब्बी हंगामात पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येवर परिणाम झाल्याचे दिसत आहे.
विमा नुकसानभरपाई मिळण्याचे बदललेले निकषही विमाधारक शेतकरी संख्या कमी होण्याचे कारण दिसत आहे. दरवर्षी रब्बी हंगामात दोन लाख हेक्टर व त्यापेक्षा अधिक क्षेत्राचा पीक विमा भरला जातो.
मात्र, यंदा ९४ हजार शेतकऱ्यांनी ६५ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा भरला आहे. साधारण दरवर्षीच्या आकडेवारीचा विचार केला असता ५० टक्क्यांपेक्षा कमी शेतकरी पीकविम्यात सहभागी झाले आहेत.
यंदाच्या खरीप हंगामात शेतकरी हिस्सा रक्कम भरायची होती. एक रुपयात पीकविमा योजना बंद झाली असताना शेतकरी हिस्सा भरून अडीच लाख शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता.
अति पावसामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असताना रब्बी हंगामात विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या घटली आहे.
वाढणाऱ्या नैसर्गिकच आपत्तीमुळे पिकांचे नुकसान होत असले तरी नुकसानभरपाईचे निकष बदलल्याने पीकविमा भरणारे शेतकरी कमी झाले आहेत. खरीप हंगामातील पिकांप्रमाणे रब्बी हंगामातील पिकांसाठीही विमा योजना आहे.
ज्वारी, गहू, उन्हाळी भुईमूग, करडई, हरभरा, कांदा या रब्बी हंगामातील पिकांचा विमा भरता येत होता. यापैकी उन्हाळी भुईमुगाचा पीकविमा भरण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत आहे.
मोफत पीकविमा भरण्याची सुविधा बंद
◼️ शेतकरी हिश्शाचा विचार केला असता दोन कोटी ३० लाख ९० हजार रुपये शेतकऱ्यांनी भरणा केला आहे.
◼️ शेतकऱ्यांनी यंदाच्या हंगामातील पिकांची विमा कंपनीकडे भरलेल्या रकमेचा विचार केला असता मागील वर्षी सहा-साडेसहा लाख रुपये भरावे लागले होते.
◼️ मोफत पीकविमा भरण्याची सुविधा बंद केल्यानेही यंदा रब्बी हंगामात विमा भरणा कमी झाला आहे.
किती क्षेत्रावर विमा
हरभऱ्याचा १५ हजार शेतकऱ्यांनी दहा हजार आठशे हेक्टर, कांद्याचा २० हजार शेतकऱ्यांनी १४ हजार सातशे हेक्टर, ज्वारीचा ३० हजार शेतकऱ्यांनी तेवीस हजार हेक्टर, भुईमूग सात हजार शेतकऱ्यांनी तीन हजार नऊशे हेक्टर, गहू २१ हजार ८०० शेतकऱ्यांनी तेरा हजार हेक्टर क्षेत्राचा पीकविमा भरला आहे.
कारणे काहीही असतील मात्र यंदा रब्बी हंगामात पीकविम्यासाठी अर्ज कमी आले आहेत. ज्वारीचे क्षेत्र घटले आहेच शिवाय पेरणी झालेल्या संपूर्ण क्षेत्राचाही शेतकऱ्यांनी विमा भरला नाही. मागील काही वर्षांत रब्बी हंगामात दोन लाख व त्यापेक्षा अधिक शेतकरी पीकविम्यात भाग घेतात. - शुक्राचार्य भोसले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
अधिक वाचा: राज्यातील 'या' बाजारात कांद्याला मिळतोय सर्वाधिक दर; वाचा, काय आहे कारण?
