सांगली : जिल्ह्यातील पाझर तलाव फुल झाले असून चांदोली, कोयना धरणे १०० टक्के भरली आहेत. तलावांसह धरणांमध्ये पाणीसाठा फुल असल्यामुळे रब्बी हंगाम चांगला जाणार अशी परिस्थिती आहे.
हातातोंडाशी आलेले पीक पाण्यात गेल्याने शेतकरी खचला, पण हार मानली नाही. शेतकरी पुन्हा उभा राहिला आहे. रब्बी हंगामातील ज्वारीची पेरणी करू लागला आहे.
जिल्ह्यात रब्बी पेरणी सरासरी एक लाख ९० हजार ३९३ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी १० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यातील दुसऱ्या आणि शेवटच्या आठवड्यात अतिवृष्टी झाली. शेतात पाणी साचले.
काढणीला आलेले सोयाबीन, भुईमूग यासह अन्य पिकांचे नुकसान झाले. खरिपाचा हंगाम हातचा गेल्यानंतर आता शेतकऱ्यांचे लक्ष पूर्णपणे रब्बी हंगामाकडे वळले आहे.
जमिनीतील ओलावा टिकून आहे. याच ओलाव्याचा फायदा घेत शेतकऱ्यांनी मिळेल त्या परिस्थितीत शेताची मशागत करण्यास सुरुवात केली आहे. जत, कवठेमहांकाळ, आटपाडी व खानापूर या दुष्काळी तालुक्यांमध्ये रब्बी ज्वारीचे क्षेत्र मोठे आहे.
विहिरी भरल्या, धरणांत ९० टक्के जलसाठा
जिल्ह्यातील ओढ्यांमधून पाणी वाहत असल्यामुळे विहिरी भरल्या असून चांदोली, कोयना धरणे १०० टक्के भरली आहेत. जिल्ह्यातील पाझर तलावही भरले असून रब्बी हंगामात पुरेल एवढा पाणीसाठा आहे.
रब्बी हंगामाची तयारी सुरू
शेतकऱ्यांनी खरीप पिके काढून रब्बी हंगामातील पेरणीला सुरुवात केली आहे. आतापर्यंत दहा हजार हेक्टरवर रब्बी हंगामाची पेरणी झाल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.
रब्बी तारणार का?
◼️ खरीप हंगामातील सोयाबीन, बाजरी, मका पीक चांगली आली होती. पण, महिनाभर झालेल्या संततधार पावसाने खरिपातील पिके डोळ्यांदेखत मातीमोल झाली.
◼️ तरीही शेतकऱ्यांनी हार न मानता रब्बी हंगामातील पेरणीला सुरुवात केली आहे. रब्बी हंगामातील पीक तरी शेतकऱ्यांच्या पदरात पडेल का? अशी शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे.
शेतकऱ्यांची कोणत्या पिकांना पसंती
जिल्ह्यातील शेतकऱ्यांची रब्बी ज्वारी, गहू पिकांना पसंत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पेरणीही या दोन्ही पिकांचीच जास्त प्रमाणात झालेली आहे.
२० हजार क्विंटल बियाणे, पावणे दोन लाख टन खतांची मागणी
◼️ जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी ज्वारीचे ३३४८, गहू, ७,७७०, मका ४,५७५ आणि हरभरा ४,३२३ क्विंटल असे एकूण १९ हजार ९१६ क्विंटल बियाणे मागणी केली आहे.
◼️ युरिया ५६,७८९, डीएपी २१,८४०, एमओपी २२,१३४, यासह अन्य खते ८१,६५८ टन असे एकूण १ लाख ८२ हजार ४३० टन खतांची मागणी आहे. मागणीप्रमाणे बियाणे, खतांची उपलब्धता आहे.
अधिक वाचा: सीमेपलीकडे कर्नाटकातील 'हा' साखर कारखाना उसाला देतोय तब्बल ४,३३९ रुपये दर; वाचा सविस्तर
