पावसाळ्याला सुरुवात झाल्यामुळे वन विभागाने १ जुलैपासून पर्यटकांसाठी जंगल सफारी बंद करण्यात येत असल्याची घोषणा केली. त्यामुळे आता पर्यटकांना पावसाळा संपेपर्यंत जंगल सफारीसाठी वाट बघावी लागणार आहे.पावसाळ्यात जंगलात वाहने अडकून पडतात. याशिवाय वन्यप्राण्यांचा प्रजनन कालावधी लक्षात घेऊन या कालावधीत वन्यप्राण्यांच्या हालचाली अबाधित ठेवण्याकरिता जंगल सफारी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील जंगल सफारीबाबत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, नवी दिल्ली यांचे दिशा निर्देश वन विभागाला मिळाले आहेत.
त्यानुसार पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्र, बोर व्याघ्र प्रकल्प आणि उमरेड-पवनी-कहांडला अभयारण्यात जंगल सफारीची सुविधा १ जुलैपासून पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहे, अशी माहिती पेंच व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक डॉ. किशोर मानकर यांनी दिली आहे.
पवनी, सुरेवानी गेटवरून सुविधा सुरू
पावसाळ्यात वन विभागाने पेंच, बोर आणि उमरेड-पवनी-कन्हांडलामधील जंगल सफारी बंद केली असली तरी पावसाळ्यात पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेता यावा यासाठी पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात पवनी (एकसंघ नियंत्रण) पर्यटन गेट आणि सुरेवानी पर्यटन गेट येथून मर्यादित स्वरूपात जंगल सफारीची सुविधा ऑफलाइन पद्धतीने उपलब्ध करण्यात आली आहे.
ताडोबा बंद, बफर क्षेत्रात सफारी सुरूच
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची कोरमधील सफारी १ जुलैपासून बंद होणार आहे. पावसाळ्यामुळे दरवर्षी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापन हा निर्णय घेतात. मात्र ताडोबा अंधारी प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रालगत असलेले बफर क्षेत्र सफारीसाठी खुले राहणार आहे.