चंद्रशेखर बर्वे
नवी दिल्ली: महाराष्ट्रासह देशात पडलेल्या जोरदार पावसामुळे साखरेचे बंपर उत्पादन होणार असल्याचा दावा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने केला आहे.
यंदा देशात एकूण ३४५ लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. तर, गेल्या वर्षीच्या तुलनेत महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन २९ टक्क्याने वाढण्याची शक्यता आहे.
महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले की, यंदा देशभरात चांगला पाऊस पडला आहे.
यामुळे साखरेचे भरघोस उत्पादन होण्याची शक्यता आहे. यंदा ३४५ लाख टन साखरेची निर्मिती होऊ शकते. मागच्या वर्षी २९६ लाख टन साखर तयार झाली होती. मोठ्या पावसामुळे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे.
कर्नाटकात सहा टक्के पेरणीक्षेत्र वाढले आहे. मात्र, उत्तरप्रदेशात पेरणीक्षेत्र तीन टक्क्यांनी घटले असले तरी उत्पादन चांगले होण्याची शक्यता आहे, असेही नाईकनवरे यांनी सांगितले.
महाराष्ट्रात यंदा २९ टक्के उत्पन्न वाढण्याची शक्यता
◼️ महाराष्ट्र आणि कर्नाटक साखर उत्पादनाच्या बाबतीत आघाडीवर राहणार आहेत.
◼️ महाराष्ट्रात १३० लाख टन साखर निर्मिती होण्याची शक्यता आहे.
◼️ गेल्या वर्षी ९३ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते.
◼️ यंदा तब्बल २९ टक्क्याने उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.
◼️ कर्नाटकातही पंधरा ते वीस टक्के उत्पादन वाढण्याची शक्यता आहे.
◼️ महत्त्वाचे म्हणजे, महाराष्ट्रात यंदा उसाचे पेरणी क्षेत्र वाढले आहे.
◼️ गेल्या वर्षी १३.८२ लाख हेक्टरमध्ये ऊस लावण्यात आला होता.
◼️ यंदा १४.७१ लाख हेक्टरमध्ये उसाची लागवड झाली आहे.
अधिक वाचा: कोल्हापूर जिल्ह्यातील 'ह्या' कारखान्याने केली सुधारित दराची घोषणा; आता विनाकपात ३६१४ रुपये देणार
