पुणे : दुष्काळसदृश परिस्थिती व नंतर अतिपाऊस व काही ठिकाणी परतीचा पाऊस झाल्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या अनेक भागांतील उभ्या उसावर तुरे पडले आहेत. त्यामुळे उसाची वाढ खुंटली असून, त्यातील साखरेचे प्रमाण घटले आहे.
त्यामुळे हा ऊस गाळपास येत असल्याने या भागातील कारखान्यांचा गाळप हंगाम अपेक्षेपेक्षा लवकर आटोपला जाण्याचा अंदाज आहे, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
त्यामुळे देशात साखर उत्पादन जेमतेम २७० लाख टन इतकेच होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षाच्या ३१९ लाख टन साखर उत्पादनाच्या तुलनेत त्यात ४९ लाख टनांची घट होण्याचा अंदाज आहे.
ऊस गाळप प्रगती आढाव्यानुसार देशात ३१ जानेवारीपर्यंत एकूण ४९४ कारखान्यांनी गाळप सुरू केले. गेल्या वर्षी ५१७ कारखान्यांनी गाळप केले होते. यंदा त्यात २३ ने घट झाली आहे.
देशात आतापर्यंत १ हजार ८५५ लाख टन उसाचे गाळप झाले असून, ते गेल्या वर्षीच्या याच तारखेपर्यंत झालेल्या १ हजार ९३१ लाख टन गाळपापेक्षा ७६ टनांनी कमी आहे.
या गाळपातून आतापर्यंत १६५ लाख टन साखर उत्पादन झाले असून, ते गेल्या वर्षीच्या या तारखेपर्यतच्या १८७ लाख टन उत्पादनापेक्षा २२ लाख टनांनी कमी आहे.
राज्यनिहाय साखर उत्पादन (कंसातील आकडा पूर्वीचा अंदाज दर्शवितो)
उत्तरप्रदेश : ९३ लाख टन (९८ लाख टन)
महाराष्ट्र : ८६ लाख टन (८७ लाख टन)
कर्नाटक : ४१ लाख टन (४५ लाख टन)
इतर राज्ये : ५० लाख टन (५० लाख टन)
इथेनॉल उत्पादनाकडे वळणारी साखर आणि निर्यात मार्गाने देशाबाहेर जाणारी साखर लक्षात घेता कदाचित हंगाम अखेर नीचांकी साखरेचा साठा शिल्लक राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अर्थात याचा अनुकूल परिणाम कारखानास्तरावरील साखर विक्रीच्या दरावर दिसू शकतो. जेणेकरून कारखान्यांची थकीत बिले, ऊस उत्पादकांची बिले व इतर अनुषंगिक खर्च वेळेवर कारखान्यांना देणे शक्य होईल. - हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ
अधिक वाचा: इथेनॉल दराचा निर्णय साखर उद्योगासाठी फायद्याचा की तोट्याचा? 'एफआरपी'च गणित कसं जुळवणार?