कर्नाटकातील साखर कारखान्यांचे गळीत हंगाम २० ऑक्टोबरपासून सुरू झाल्यामुळे सांगली जिल्ह्यातील १७ कारखान्यांचा गळीत हंगामही सोमवार, २७ ऑक्टोबरपासून सुरू करण्याची तयारी कारखानदारांनी सुरू केली आहे. मात्र, एकाही कारखानदाराची भूमिका ऊस दर जाहीर करण्याची नाही, असे समजते.
२०२४-२५ च्या गळीत हंगामामध्ये जिल्ह्यातील एकूण १९ साखर कारखान्यांपैकी १७ साखर कारखान्यांनी गळीत हंगाम घेतले. हीच परिस्थिती यंदाही राहील अशी शक्यता आहे. २० ऑक्टोबरपासून कर्नाटक राज्यातील साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरु झाले आहेत.
ते कारखाने कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील सीमावर्ती भागातील ऊस उचलतात. त्यामुळे उसाची टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यातील गळीत हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
३७५१ रुपये द्या, मगच गाळप करा : राजू शेट्टी
• गेल्या वर्षभरात साखरेची विक्री सरासरी ३८०० रुपये क्विंटलने झालेली आहे. इथेनॉल, बायोगॅस (जैववायू), मळी, अल्कोहोल यांसह इतर उपपदार्थांनाही चांगला भाव मिळाला आहे.
• यामुळे गत हंगामातील उसाला प्रतिटन २०० रुपये दुसरा हप्ता व चालू गळीत हंगामातील पहिली उचल विनाकपात ३,७५१ रुपये मिळाले पाहिजेत.
• पहिली उचल जाहीर करूनच कारखानदारांनी उसाची तोड सुरू करून गळीत हंगाम चालू करावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.