कोल्हापूर : शेतकरी संघटनांनी प्रतिटन ३७५० रुपये पहिल्या उचलीची मागणी केली असली तरी जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे पहिल्या उचलीची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे.
साधारणतः ३४५० ते ३५०० रुपयांपर्यंत पहिली उचल देण्याची मानसिकता कारखानदारांची आहे. त्यामुळे एफआरपी हीच यंदाची पहिली उचल ठरण्याची शक्यता आहे.
मात्र, शेतकरी संघटनांना ही उचल मान्य होणार का? यावरच यंदाच्या हंगामातील संघर्ष अवलंबून आहे. गेल्या वर्षभरापासून साखरेला खुल्या बाजारात चांगला दर मिळत आहे.
इतर उपपदार्थांनाही चांगला भाव मिळत असल्याने साखर कारखान्यांच्या हातात पैसे आहेत. त्यात यंदा सततच्या पावसाने उसाच्या उत्पादनात घट होणार आहे.
त्यामुळे कारखाने पूर्ण क्षमतेने चालवणे कठीण होणार आहेत. हा सगळा हिशेब मांडत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रतिटन ३७५० रुपये पहिल्या उचलीची मागणी केली आहे.
यावरून, आंदोलन सुरू झाले आहे. संघटनांनी एकीकडे दराची मागणी केली असताना साखर कारखानदार पहिल्या उचलीची घोषणा करू लागले आहेत.
एफआरपीचा अंदाज घेऊन कारखान्यांनी प्रतिटन ३४०० ते ३४५० रुपयांपर्यंत उचल जाहीर केली आहे. जास्तीत जास्त ३५०० रुपयांपर्यंत उचल जाऊ शकते. ही उचल संघटनेला मान्य होणार का? यावरच ऊस दराचे आंदोलनाचा संघर्ष अवलंबून आहे.
पूर्वेकडे आंदोलन पेटले
जिल्ह्याच्या पूर्वेकडे हातकणंगले, शिरोळ तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना, आंदोलन अंकुश आक्रमक आहे. येथे आंदोलनाने पेट घेतला असून ऊसदराची कोंडी फुटत नाही, तोपर्यंत आंदोलन तीव्र होत जाण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा: उसतोड मशीन संघटनेच्या 'या' मागण्या तत्काळ मान्य न झाल्यास १ नोव्हेंबरपासून ऊस तोडणी बंद
