ज्वारीचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्याच्या मंगळवेढा येथील काळ्या शिवारातील ज्वारीचीपेरणी पावसामुळे एका महिन्याने पुढे गेल्याने यंदा ज्वारीचे पीक घटणार आहे. तालुक्यामध्ये १५ ते ३० सप्टेंबरपर्यंत ज्वारीची पेरणी केली जाते. मात्र, सप्टेंबर महिन्यात ५ तारखेपासून सलग कमी-जास्त प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे ज्वारीची पेरणी खोळंबली आहे.
शेतकऱ्यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये शेतीचे मशागत केले होते. यामध्ये गवत उगवून आले आहेत. शेतीचे पेरणीपूर्व तयारी करून ठेवली होती. पेरणी सुरुवात करण्याचा प्रयत्न काही शेतकऱ्यांनी केला होता. मात्र, त्याच दिवशी पाऊस पडल्यामुळे ज्वारीच्या पेरणीवर या पावसाचा मोठा परिणाम झाला आहे.
येथील जमिनी काळी भुसभुशीत असल्यामुळे थोडा जरी पाऊस पडला, तरी या जमिनीमध्ये महिनाभरापर्यंत ओलावा व गारवा तयार होतो. त्यामुळे नैसर्गिक येणारी खाण्यासाठी ज्वारी यावर्षी मोठ्या संख्येने घटणार आहे. त्यामुळे भविष्यात ही मालदांडी ज्वारी महाग होण्याची शक्यता आहे.
पाऊस असाच सुरू झाला, तर किमान महिना ते दीड महिना या शेतीला वापसा येणार नाही, मात्र ऑक्टोबर १० तारखेनंतर जी बागायत क्षेत्रामध्ये ज्वारीची पेरणी होते. त्यानंतरच या काळा शिवारामध्ये हरभरा, करडई, जवस, सूर्यफूल या पिकांची पेरणी होण्याची शक्यता आहे. सतत पाऊस राहिल्यास याही सर्व पिकांच्या पेरणीवर प्रश्नचिन्ह उभा राहणार आहे.
१६००० हेक्टर काळे शिवार
मंगळवेढा तालुक्यामध्ये १६ हजार हेक्टर काळे शिवारातील ज्वारीची शेतजमीन आहे, यामध्ये दामाजी कारखाना, सोलापूर रोड, बोराळे, भालेवाडी, मरवडे तसेच मल्लेवाडी, धर्मगाव रोड परिसर या भागात ज्वारी, करडई, हरभरा ही पिके पावसावर घेतली जाते.
कोरडवाहू शेतीमध्ये पाणी साठले आहे. त्यामुळे तालुक्यातच रब्बी पिकाला मोठा फटका बसणार आहे. उत्पादन कमी खर्च जास्त होणार आहे. - सदाशिव पिंपळे, शेतकरी, मंगळवेढा.
सध्या ज्वारी प्रतिक्विंटल अडीच हजार ते साडेचार हजारांपर्यंत असून, ही ज्वारी उत्पन्न घटल्यास भविष्यात दर वाढण्याची शक्यता आहे. - पांडुरंग नकाते, व्यापारी, कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळवेढा.