पंढरपूर : बहुचर्चित शक्तीपीठ महामार्गाचेपंढरपूर तालुक्यातील रेखांकन रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी नागपूर अधिवेशनात केल्यानंतर या निर्णयाचे पंढरपूर तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांनी जोरदार स्वागत केले आहे.
दरम्यान हा मार्ग आता पंढरपूर तालुक्याच्या पूर्व भागातून न जाता पश्चिम भागातून जाणार असल्यामुळे पंढरपूर तालुक्यात नवीन भागात नवीन मार्ग होणार असल्यामुळे विकासाला चालना मिळणार आहे.
प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग पंढरपूर तालुक्यातील कासेगाव, अनवली, खर्डी, तापकीर शेटफळ, आंबे, रांजणी, विटे, पोहोरगाव, तारापूर अशा सुपीक पट्ट्यातून जात होता.
भीमा नदीमुळे या भागातील जमीन बारमाही बागायती आहे, ऊस, द्राक्षे, डाळिंब अशी नगदी पिके घेऊन या भागातील शेतकरी समृद्ध झालेला आहे. याच सुपीक पट्टयातून समृद्धी महामार्ग प्रस्तावित करण्यात आलेला होता. महामार्गाचे रेखांकन झाले होते.
मात्र प्रत्यक्षात जमिनीची नुकसान भरपाईचे निकष लक्षात येताच लाखो रुपये किमतीच्या जमिनी मातीमोल भावाने गमवाव्या लागणार असल्याचे शेतकऱ्यांना दिसून आले.
यावर सर्व्हेक्षण करतेवेळी मात्र शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला. प्रशासनाने सक्तीने सर्व्हेक्षण करण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.
तसेच पोहोरगाव येथील काही शेतकरी मुंबई उच्च न्यायालयातही गेले. शेकडो शेतकऱ्यांनी नोटिसींना हरकती घेतल्या होत्या, सुनावणी वेळीही शेतकऱ्यांनी आपला विरोध दाखवला होता.
या एकूणच तीव्र विरोधानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील हिवाळी विधानसभा अधिवेशनात शक्तीपीठ महामार्गाचे रेखांकन रद्द ते दुसरीकडे वळवण्यात येत असल्याची घोषणा केली.
त्यानंतर शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला असून जमिनी वाचल्याची भावना शेतकरी बोलून दाखवत आहेत.
कशी आहे मार्गाची नवीन दिशा?
पंढरपूर तालुक्याच्या पश्चिम भागातून हा मार्ग रद्द झाल्याच्या घोषणेनंतर या मार्गाची दिशा बदलल्यानंतर आता हा मार्ग पंढरपूर तालुक्याच्या पश्चिम भागातून बार्शी, वैराग, करकंब, भोसे, पटवर्धन कुरोली मार्ग सांगोल्याला जोडला जाणार आहे. या मार्गाच्या नवीन सर्वेक्षणास सुरुवात झाली असली तरी प्रशासनाकडून गुप्तता पाळली जात आहे.
लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांकडे पाठ फिरवली
आपल्या अमूल्य जमिनी वाचवण्यासाठी शेतकरी अंगावर केसेस घेऊन शासनाचा विरोध करीत असताना पंढरपूर, मोहोळ आणि सांगोला तालुक्यातील एकही लोकप्रतिनिधी शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहिला नाही. शेतकऱ्यांच्या बाजूने विधानसभेत केवळ आ. अभिजित पाटील यांनी आवाज उठवला होता.
अधिक वाचा: माण तालुक्यातील शेतकऱ्याच्या डाळिंबाला पुणे मार्केटमध्ये उच्चांकी भाव; वाचा काय मिळाला दर?
