सोलापूर : सरलेल्या हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे थकविणाऱ्या पाच साखर कारखान्यांची आरआरसी अन्वये साखर आयुक्तांनी कारवाई केली आहे.
त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील तीन व बीड, अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येकी एका कारखान्यांचा समावेश आहे. या पाच साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे थकवले आहेत.
मागील हंगामात शेतकऱ्यांचे पैसे थकविल्याने आतापर्यंत २० कारखान्यांवर कारवाई झाली असून त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील १२ साखर कारखान्यांचा समावेश आहे.
साखर कारखाने बंद होऊन दोन-तीन महिन्यांचा कालावधी लोटला तरीही अनेक कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे थकविले आहेत.
साखर सहसंचालक कार्यालयाकडून अनेक वेळा नोटीस बजावण्यात आल्यानंतरही साखर कारखाने शेतकऱ्यांचे पैसे देण्यास तयार नाहीत. त्यांच्या साखर आयुक्त सिद्धाराम सालिमठ हे सुनावणी घेतात.
मात्र, अनेक कारखाने एफआरपीची रक्कमही देण्यास तयार नाहीत. अशा राज्यातील २० साखर कारखान्यांवर दोन टप्प्यांत आरआरसी अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यात १५ साखर कारखान्यांवर केलेल्या कारवाईत सोलापूर जिल्हातील ९, तर दुसऱ्या टप्प्यात कारवाई झालेल्या पाच कारखान्यांमध्ये सोलापूर जिल्हातील तीन कारखाने आहेत.
दुसऱ्या टप्प्यातील कारवाई
स.शि. वसंतराव काळे पंढरपूर - १,११६
सिद्धेश्वर कुमठे सोलापूर - २,०९२
अवताडे शुगर मंगळवेढा - २,३०९
जय महेश माजलगाव, बीड - १,८६७
गंगामाई शेवगाव अहिल्यानगर - ४,२१०
(वरील थकबाकीचे आकडे लाखांत आहेत.)
या १५ साखर कारखान्यांकडे ३७२ कोटी ६१ लाख थकबाकी
मातोश्री लक्ष्मी अक्कलकोट, गोकुळ शुगर धोत्री सोलापूर, लोकमंगल अॅग्रो बीबीदारफळ, लोकमंगल शुगर भंडारकवठे, जय हिंद शुगर आचेगाव, श्रीसंत दामाजी मंगळवेढा, सिद्धनाथ शुगर तिर्हे, इंद्रेश्वर शुगर बार्शी, धाराशिव शुगर सांगोला, भीमाशंकर शुगर धाराशिव, स्वामी समर्थ शुगर नेवासा, श्री. गजानन महाराज संगमनेर, खंडाळा तालुका सातारा, किसनवीर सातारा, सचिन घायाळ छ. संभाजीनगर या १५ साखर कारखान्यांकडे ३७२ कोटी ६१ लाख रुपये थकल्याने मार्च महिन्यात आरआरसी कारवाई करण्यात आली आहे.
अधिक वाचा: मेंढरं चारणारा बिरदेव युपीएससीच्या रँकमध्ये झळकला; चंद्रमौळी झोपडीवर यशाचा झेंडा