देशातील अनेक शहरांमध्ये उष्णतेची लाट वेगाने पसरत असून तापमानाचा पारा ४२-४४ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
वाढत्या उष्णतेमुळे केवळ थकवा जाणवत नाही, तर उन्हाच्या तडाख्यामुळे शरीरातील तीन महत्त्वाच्या अवयवांना गंभीर इजा होऊ शकते, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनेही इशारा दिला आहे की, जुने आजार असलेल्या व्यक्तींसाठी उष्णतेची लाट अधिक घातक ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
या अवयवांवर सर्वाधिक परिणाम
१) हृदय
◼️ डॉक्टराच्या मते, शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी रक्ताचा प्रवाह त्वचेकडे वळवला जातो.
◼️ यामुळे हृदयाला रक्त पंप करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागते.
◼️ डिहायड्रेशनमुळे रक्त घट्ट होऊन हृदयविकाराच्या झटक्याचा धोका वाढू शकतो.
◼️ विशेषतः रक्तदाब असलेल्या रुग्णांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.
२) मेंदू
◼️ जेव्हा शरीराचे तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर जाते, तेव्हा 'हीट स्ट्रोक'चा धोका निर्माण होतो.
◼️ अशा स्थितीत मेंदूचे कार्य विस्कळीत होते.
◼️चक्कर येणे, गोंधळलेली अवस्था, तीव्र डोकेदुखी किंवा बेशुद्ध पडणे ही याची लक्षणे आहेत.
◼️ वेळेवर उपचार न मिळाल्यास ही स्थिती जीवघेणी ठरू शकते.
३) किडनी
◼️ प्रचंड उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते.
◼️ यामुळे किडनी शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास असमर्थ ठरते.
उष्णतेपासून संरक्षणासाठी डॉक्टरांचे हे ६ खास सल्ले
१) पाणी आणि ओआरएस : दिवसातून वारंवार पाणी, लिंबू सरबत किंवा ओआरएसचे पाणी प्यावे.
२) वेळेचे भान : दुपारी १२ ते ४ या वेळेत थेट उन्हात बाहेर पडणे टाळा.
३) पेहराव : हलक्या रंगाचे आणि सैल, सुती कपडे वापरावेत.
४) आहार : जास्त तेलकट, तिखट आणि जड अन्न खाणे टाळा.
५) डोक्याचे संरक्षण : घराबाहेर पडताना टोपी, छत्री किंवा उपरणे (गमछा) वापरून डोके झाकून ठेवा.
६) तत्काळ उपाय : जर चक्कर येणे, उलट्या किंवा अशक्तपणा जाणवत असेल, तर त्वरित थंड ठिकाणी जाऊन विश्रांती घ्यावी आणि गरज पडल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा.
अधिक वाचा: मधुमेहाच्या रुग्णांसाठी गुणकारी असलेल्या जांभळांना उच्चांकी भाव; वाचा प्रतिकिलो काय मिळतोय दर?
