सोलापूर: भीमा आणि सीना नदीला आलेल्या पुरामुळे ज्यांच्या घरात पाणी शिरले त्यांचे पंचनामे पूर्ण होत आहेत. या बाधितांच्या खात्यावर बुधवारपासून दहा हजार रुपये जमा होतील, असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी रविवारी जिल्ह्यातील पूरस्थिती आणि शासनाकडून सुरु असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, शासनाने पूरग्रस्तांसाठी १० किलो तांदूळ आणि गहू देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही मदत सुरू आहे. घरांचे नुकसान झाल्यामुळे बाधितांना दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत.
सहा तालुक्यांतील ८८ गावे बाधित
पुरामुळे माढा तालुक्यातील २२, करमाळा ११, मोहोळ २१, अक्कलकोट १० आणि उत्तर सोलापूर ९, दक्षिण सोलापूर तालुक्यातील १५ गावे अशी एकूण ८८ गावे बाधित झाली आहेत. पुरात अडकलेल्या ४ हजार ५२१ जणांची सुटका करण्यात यश आले आहे.
दोन दिवसांत २० टन चारा वाटप
पुरामुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यासाठी आजूबाजूच्या जिल्ह्यातून चारा खरेदी करण्यात येत आहे. शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत २० टन चारा वाटप झाला. सोमवारी १०० टनांपेक्षा जास्त चारा वाटप होईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्हा सक्षम, बाहेरची मदत आली तर स्वागत
पूरग्रस्तांना जिल्ह्यातील साखर कारखाने, बँका, संस्था यांच्याकडून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारची मदत होत आहे. बाहेरून मदत आली तर स्वागतच पण, हा जिल्हा सध्या तरी लोकांना मदत करण्याच्या बाबतीत पूर्णपणे सक्षम असून आलेली मदत आम्ही नियोजनपूर्वक पूरग्रस्तांना पोहोचविण्यासाठी यंत्रणा कार्यरत केल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
१२ हजार ९५६ लोक निवारा केंद्रात
जिल्ह्यातील पूरग्रस्तांना निवारा केंद्रात ठेवण्यात आले आहे. एकूण १२० निवारा केंद्रे असून, यामध्ये अक्कलकोट तालुक्यात ३५, उत्तर सोलापूर २८५९, करमाळा ५६०, दक्षिण सोलापूर २४३, माढा ५४२६, मोहोळ तालुक्यात ३,८०० लोक निवारा केंद्रात आहेत.
१८ हजार कोंबड्या, १५६ जनावरांचा मृत्यू
पावसामुळे जिल्ह्यात १०३ मोठी जनावरे आणि ५३ लहान जनावरांचा मृत्यू झाला. कुक्कुटपालन केंद्रातील १८ हजार ४१ कोंबड्यांचा मृत्यू झाला.
जिल्ह्यासाठी आज ग्रीन अलर्ट
जिल्ह्यासाठी रविवारी यलो अलर्ट होता. सोमवारी ग्रीन अलर्ट असल्याने हलकासा पाऊस पडण्याची शक्यता आहे. अहिल्यानगर आणि धाराशिव जिल्ह्यात सोमवारी यलो अलर्ट आहे.
अधिक वाचा: Maharashtra Rain : यंदा पावसाचा ट्रेंड बदलला? महाराष्ट्रात आज कुठे कोणता अलर्ट?