कर्नाटक सरकारने त्यांच्याकडील साखर कारखान्यांना १ नोव्हेंबरपासून ऊस गळीत हंगाम सुरू करण्याचे आदेश दिले होते. पण, शनिवारी त्यामध्ये अचानक बदल करून उद्या सोमवार (दि. २०) पासून सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कर्नाटक सरकारच्या या निर्णयामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील सीमाभागातील साखर कारखान्यांच्या अडचणी वाढणार आहेत. त्यांच्या पोटात गोळाच आला आहे. महाराष्ट्र सरकारच्या मंत्री समितीने राज्यातील गळीत हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे निश्चित केले आहे.
पण, त्याचवेळी सीमाभागातील साखर कारखान्यांनी कर्नाटक सोबत हंगाम सुरू करण्याची मागणी केली होती. कर्नाटक सरकारेही १ नोव्हेंबरपासून हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र, त्यात बदल करून आता सोमवारपासून सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे सीमाभागातील कारखान्यांसमोरील उसाच्या पळवा पळवीच्या अडचणी वाढल्या आहेत.
मागील हंगामात ४५ लाख टनांची उचल
• कर्नाटकातील साखर कारखाने लवकर सुरू होत असल्याने ते सीमाभागातील उसाची मोठ्या प्रमाणात पळवापळवी करतात. गेल्या गळीत हंगामात कर्नाटकातील साखर कारखान्यांनी तब्बल ४५ लाख टन उसाची महाराष्ट्रातून उचल केली होती. यंदा मे पासून सलग पाऊस सुरू असल्याने उसाची वाढ पुरेशी झालेली नाही.
• त्यामुळे ऊस टंचाईचे संकट असताना कर्नाटकातील कारखान्यांनी सीमावर्ती भागातील ऊस नेल्यास कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील कारखान्यांच्या अडचणी वाढणार आहेत.
• साधारणतः दिवाळी झाल्यावर ऊसतोड मजूर येतात आणि हंगाम सुरू होतो तो विचार करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही कारखानदारांना १० नोव्हेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे.