पुणे: दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ रोजी माननीय पंतप्रधान महोदयांच्या शुभहस्ते प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना, राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान, कडधान्य अभियान शुभारंभ कार्यक्रम राष्ट्रीय विज्ञान संकुल पुसा, नवी दिल्ली येथे संपन्न झाला.
हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हा, तालुका मुख्यालय, ग्रामपंचायत, कृषी विज्ञान केंद्र, बाजार समिती, प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था, प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र अशा विविध ठिकाणी लोकप्रतिनिधी व शेतकरी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
शेती क्षेत्रासमोर वातावरण बदल, कमी उत्पादकता, कमी सिंचन क्षमता, कृषी कर्जाची अपुरी उपलब्धता, साठवणूक सुविधांची कमतरता, काढणी पश्चात पायाभूत सुविधा, प्रक्रिया, मूल्यवर्धन, विपणन यासंदर्भात मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत.
या अडचणींना सामोरे जाऊन शाश्वत शेती पद्धतीचा विकास करणे, जमिनीची सुपीकता वाढवणे, पिकांच्या उत्पादनात वाढ करणे, मिश्र पीक पद्धती, पाण्याचा किफायतशीर वापर यांच्यावर भर दिला जाणार आहे.
तसेच उत्पादित मालाची साठवणूक, विपणन, प्रक्रिया, मूल्यवर्धन करून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे व उत्पन्न वाढवणे या दृष्टिकोनातून देशातील १०० कृषी आकांक्षीत जिल्हे यांची या धनधान्य योजनेत निवड करण्यात आलेली आहे.
ही निवड करताना कमी उत्पादकता, अपुरा सिंचन पुरवठा, कर्जाची मर्यादित उपलब्धता, निव्वळ पिकाखालील क्षेत्र, शेती खातेदारांची संख्या अशा विविध बाबी विचारात घेतल्या आहेत.
देशात प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना अंतर्गत १०० जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून त्यात महाराष्ट्र राज्यातील पालघर, रायगड, धुळे, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या नऊ जिल्ह्यांचा समावेश आहे.
कृषी व ग्रामीण विकासाच्या दृष्टिकोनातून शासनाच्या विविध विभागांमार्फत स्वतंत्ररीत्या अनेक योजना राबवल्या जातात. मात्र त्याचा एकत्रित परिणाम दिसून येण्यासाठी अशा विविध विभागांच्या योजनांचे एकत्रीकरण करून या निवडलेल्या जिल्ह्यांमध्ये प्राधान्याने त्या योजना राबवण्यात येणार आहेत.
यासाठी सदर जिल्ह्याचे पायाभूत सर्वेक्षण करून जिल्हा विकास आराखडा बनवण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
ज्यात कृषी विकासाशी निगडित खात्याचे अधिकारी व जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी, शास्त्रज्ञ, संशोधक, बँका यांचा समावेश राहणार आहे. यांच्या एकत्रित प्रयत्नातून जिल्ह्याचा विकासाचा पाच वर्ष आराखडा तयार करण्यात येऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
या योजनेचे सनियंत्रण. मूल्यमापन राष्ट्रीय स्तरावरून नीती आयोगाच्या माध्यमातून केले जाणार आहे. कृषी पिकांची उत्पादकता वाढवणे आवश्यक असताना जमीन, पाणी सारख्या नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास होऊ नये.
पर्यावरण समतोल राहावा. या दृष्टिकोनातून उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत. याचबरोबर कडधान्याच्या बाबतीत परदेशातून होणाऱ्या आयातीवर अवलंबून न राहता स्वयंपूर्णता मिळवण्याचे उद्दिष्ट या योजने पाठीमागे आहे.
हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान तसेच राष्ट्रीय कडधान्य अभियान देखील राज्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
या एकत्रित उपाय योजनांच्या माध्यमातून शाश्वत विकास साध्य करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना ,राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान व राष्ट्रीय कडधान्य अभियान याची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे.
आज या अभियान शुभारंभ कार्यक्रमाचा एक भाग म्हणून राज्यस्तरीय कार्यक्रम राज्याचे कृषी मंत्री मा. ना. दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली कै. यशवंतराव चव्हाण सभागृह, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुणे, मुख्यालय पुणे या ठिकाणी संपन्न झाला.
सदर कार्यक्रमास मा. आमदार बापूसाहेब पठारे तसेच व राज्याचे कृषी आयुक्त मा. सूरज मांढरे तसेच कृषी संचालक मा. अशोक किरनळ्ळी, मा. अंकुश माने, मा. रफिक नाईकवडी, मा. विनयकुमार आवटे, मा. सुनील बोरकर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमास पुणे, सोलापूर, अहिल्यानगर व राज्यातील इतर जिल्ह्यातील एकूण ५६८ कृषी सखी, कृषि पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी, पीक स्पर्धा विजेते प्रगतशील शेतकरी, नैसर्गिक शेती करीत असलेले प्रगतशील शेतकरी, शेतकरी गट/शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी व कृषि व कृषी विभागातील अधिकारी/कर्मचारी यांनी आपला सहभाग नोंदवला.
सदर कार्यक्रमावेळी राज्याचे मा. कृषी मंत्री तसेच मा. कृषी आयुक्त यांनी उपस्थित शेतकरी बंधू भगिनींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमावेळी राज्याचे मा. कृषी मंत्री यांनी उपस्थित कृषी सखी यांच्याशी संभाषण करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व सदर अडचणींचे कृषी विभागामार्फत निराकरण करण्याचा प्रयत्न करू असे आश्वस्त केले.
कार्यक्रम प्रसंगी कृषी विभागाकडून ६ नैसर्गिक शेती करणाऱ्या प्रगतशील शेतकरी व कृषी सखी यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला.
वेबकास्ट प्रणालीद्वारे देशातील व राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी यात आपला सक्रिय सहभाग नोंदवला तसेच पुणे येथील कार्यक्रमामध्ये नवी दिल्ली येथील शुभारंभ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले असून सर्व उपस्थितानी सदर कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला.
अधिक वाचा: राज्यातील 'या' तालुक्यांना मिळणार अतिवृष्टी व पूर आपत्तीच्या सवलती; तालुक्यांची सुधारित यादी आली
