सोलापूर : मे महिन्यात 'जोरधारा' कोसळल्यानंतर जमिनीवर उभ्या असलेल्या उसाला खते टाकून बांधणी केली, जून-जुलै महिन्यात जेमतेम पाऊस पडत गेल्याने साडेचार लाख हेक्टरवर खरीप पेरणी केली.
मोठ्या प्रमाणावर असलेल्या गोधनासाठी चाराही केला. मात्र, ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यातील कोसळधारांनी सारे धुऊन गेले आहे.
मे महिन्यापासून केलेला खर्च तर वाहून गेला आहेच, शिवाय आता पावसाने उघडीप दिली तरी बहुतांश क्षेत्रावर रब्बीही येण्याची शक्यता नाही.
त्यामुळे बाधित क्षेत्रासाठी मदतीच्या रकमेत वाढ करण्याची मागणी होत आहे. मे महिन्यात जिल्ह्यात बऱ्यापैकी ऊस क्षेत्र, फळबागा, जनावरांसाठी हिरवा चारा व पालेभाज्या ही पिके होती.
मे महिन्यात दमदार पाऊस झाल्याने अधिक वजन भरण्याच्या अपेक्षेने उसाला अपेक्षित खते व बांधणीचा खर्च केला. जून-जुलै महिन्यात खरीप पेरणी वेगाने उरकली. त्यासाठीही शेतकऱ्यांनी खर्च केला.
पशुधनाचा हिरवा चाराही केला. मात्र, ऑगस्ट-सप्टेंबरच्या जोरदार पावसाने एकही पीक वाचले नाही. सततच्या पावसाने वैरण काढता येत नाही. काढलेली वैरण खाता येत नाही.
खरीप तर गेलेच शिवाय उसही नीट राहिला नाही. वैरणीअभावी जनावरांच्या दुधावर परिणाम झाला आहे. फळपीक कुठे राहिले का? शोधावे लागणार आहे.
पिकांतून पाणी वाहतेय..
◼️ बीबीदारफळ येथील मोहन विनायक साठे व इतर दोन भावांना ३० एकर जमीन आहे. त्यामध्ये १० एकर ऊस, मका, सोयाबीन, काकडी, जनावरांसाठी वैरण व इतर पिके होती.
◼️ मे महिन्यात पाऊस सुरू झाल्यानंतर शेतातून पाणी वाढण्यास सुरुवात झाली. मध्ये काही दिवस पाणी कमी झाले. मात्र, ऑगस्टपासून ३० एकरांतून पाणी वाहत आहे.
◼️ उसाच्या वरून पाणी वाहतेय. अशीच बीबीदारफळ येथील पिकांची परिस्थिती आहे. कसे जगायचे हा प्रश्न आहे?
अशी मिळणार नुकसान रक्कम
◼️ जिरायत - प्रतिहेक्टर ८ हजार ५०० रुपये (दोन हेक्टरपर्यंत)
◼️ बागायत - प्रतिहेक्टर १७ हजार (दोन हेक्टरपर्यंत)
◼️ फळबागा - २२ हजार ५०० रुपये (दोन हेक्टरपर्यंत)
◼️ जमीन तीन इंचापेक्षा अधिक खरडून गेली तर हेक्टरी ४७ हजार रुपये.
◼️ इतर ठिकाणचे दगड, मुरुम, वाळू वाहून दुसऱ्या जमिनीवर आली तर हेक्टरी अठरा हजार रुपये.
अधिक वाचा: संगिता ताईंनी बाराशे रुपयांच्या कर्जातून सुरू केलेला सुकामेवा व्यवसाय आज करतोय २५ लाखांची उलाढाल