कोल्हापूर : कर्नाटकप्रमाणेच जिल्ह्यात सध्या बारमाही गुळाचे उत्पादन घेतले जात आहे. यामुळे गुळाच्या हंगामावर परिणाम झाला आहेच, त्याचबरोबर बारा महिने गुऱ्हाळ सुरू ठेवत असताना जळणाचा प्रश्नही डोके वर काढत आहे.
बारमाही चिपाडाचे जळण मिळत नाही, त्यात लहरी हवामानामुळे एक महिनाही विनापावसाचा जात नसल्याने त्याचा परिणाम जळण वाळण्यावर होत आहे. त्यातूनच प्लास्टिक कागद, कुशन, वाहनांच्या टायरचा वापर सर्रास वाढला आहे.
याचा गुळाच्या प्रतीवर परिणाम दिसतोच, त्याचबरोबर प्रदूषण वाढत असल्याच्या तक्रारीही आहेत. गाळप कमी झाल्याने चिपाड कमी मिळते. बारमाही गुऱ्हाळघर चालवण्यास जळण आणायचे कोठून, असा प्रश्न आहे.
गेल्यावर्षीपेक्षा २.२६ लाख गूळरव्यांची आवक वाढली
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत गेल्यावर्षीच्या तुलनेत २ लाख २६ हजार ६१९ गूळव्यांची आवक वाढली आहे. बारमाही उत्पादन सुरू असल्याने आवकेवर हा परिणाम दिसत आहे.
बारमाही गूळ मिळतो, मग हंगामाची गरज काय?
◼️ गुजरात, राजस्थानमधून गुळाची मागणी अधिक असते. साधारणतः ऑक्टोबरला हंगाम सुरू झाला की, व्यापारी मोठ्या प्रमाणात गूळ खरेदी करतात.
◼️ मात्र, अलीकडे बारमाही गूळ तयार केला जात आहे. वर्षभर गूळ उपलब्ध होत असल्याने व्यापारी हंगामाची वाट पाहत नाहीत.
रोपवाटिकेतील कांड्याचे गाळप
◼️ पावसाळ्यात आपल्याकडे उसाची उपलब्धता नसते. तरीही गुऱ्हाळघरे जोमात सुरू असल्याचे दिसतात.
◼️ रोपवाटिकेमध्ये रोपे तयार करताना शिल्लक राहिलेल्या कांड्यांपासून गूळ तयार केला जातो.
◼️ त्याचबरोबर काही ठिकाणी आठ-नऊ महिन्यांचा कोवळा ऊस गाळप करून त्यात साखर मिसळून गूळ तयार केला जातो
बारमाही गुऱ्हाळघरे सुरू झाल्याने चिपाडाचा प्रश्न गंभीर आहे, ही वस्तुस्थिती आहे. यामुळेच कुशनसह इतर वस्तूंचा वापर होतो. मात्र, औद्योगिक वसाहतीमध्ये राजरोसपणे याचा वापर सुरू आहे. गुऱ्हाळघरांप्रमाणे सगळीकडेच बंदी घातली तर प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. - रामचंद्र पाटील, गुऱ्हाळघर मालक, अर्जुनवाडा
अधिक वाचा: कर्नाटकातील साखरमिश्रित गुळाच्या स्पर्धेत 'कोल्हापुरी' गूळ टिकणार का? जाणून घ्या सविस्तर
