दत्ता पाटील
म्हाकवे : वेल्डिंग व्यवसायातील शिल्लक रक्कम शेतीत वापरून म्हाकवे येथील भैरवनाथ नाना पाटील याने खडकाळ जमिनीत उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर करत ठरलेल्या वेळेत शेतीची कामे करून २७ गुंठ्यांत ६७ टन उत्पादन घेतले.
सुमारे चार लाख रुपये खर्च करून माळरान असणाऱ्या जमिनीतील दगड-गोटे बाहेर जमिनीत माती सोडून रानाची उत्पादकता वाढविली आहे.
गतवर्षी चौथाईने पाणी घेऊन गुंठ्याला सव्वादोन टनाचे उत्पन्न मिळाले होते. त्यामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या भैरवनाथने पाच लाख खर्चुन पाण्याची सोय केली. त्यांनी यंदा गुंठ्याला अडीच टन ऊस उत्पादन घेतले आहे.
ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरट करून त्यामध्ये शेणखत चार व कंपोस्ट खताच्या चार ट्रॉल्या टाकून साडेचार फूट सरी सोडली.
५ जून २०२४ रोजी 'को ८६०३२' जातीच्या उसाची लागण केली. चार आळवण्या, चार फवारण्या तसेच ठिबकमधून रासायनिक खतांचा वापर करण्यात आला.
त्यांना प्रगतिशील शेतकरी विजय मगदूम, सिद्राम पाटील, सुहास कोगनोळे, संदीप कोंडेकर, दीपक पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रतिगुंठा सहा हजार नफा
◼️ शेती हा उद्योग म्हणूनच करायला हवा.
◼️ मशागतीपासून बियाणे, खते, कीटकनाशके, तणनाशक यासाठी ७० हजारांचा खर्च झाला आहे.
◼️ खर्च वजा जाता १ लाख ६५ हजार रुपये नफा मिळाला.
◼️ दुसऱ्या शेतात असणाऱ्या खोडव्यातूनही सव्वा टनाने उत्पन्न मिळेल, असा अंदाजही भैरवनाथ पाटील यांनी व्यक्त केला.
