रत्नागिरी : यावर्षी मे महिन्यापासून सुरू झालेला पाऊस अद्याप सुरूच आहे. सप्टेंबरमध्ये पावसाने आपले चंबुगबाळे आवरल्यानंतर ऑक्टोबरपासून हिवाळा सुरू होतो.
दिवसा कडकडीत ऊन व रात्री गारवा असे वातावरण असते. यावर्षी मात्र ऑक्टोबर संपला तरी पाऊस सुरूच आहे. जमिनीतील ओलावा कायम आहे.
यावर्षी 'ऑक्टोबर हीट' जाणवलीच नाही. त्यामुळे आंबा कलमांना पालवी सुरू झाली आहे. परिणामी यावर्षी आंबा हंगाम लांबणार असल्याचे बागायतदार सांगत आहेत.
हवामानातील बदलाचा परिणाम दरवर्षी आंबा उत्पादनावर होत आहे. नवरात्रानंतर काही दिवस 'ऑक्टोबर हीट'ची सुरुवात झाली होती; परंतु दिवाळीत पावसाने हजेरी लावली आणि तो अद्याप कायम आहे.
जमिनीमध्ये ओलावा असल्यामुळे 'कल्टार' सारखी संजीवके वापरलेल्या झाडांसह न वापरलेल्या झाडांनाही पालवी सुरू झाली आहे.
पालवी जून होण्यास दोन ते अडीच महिन्यांचा अवधी लागतो. त्यानंतरच आंबा कलमांना मोहोर प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. ऋतुमानाचे चक्र बदलल्यामुळे आंबा हंगामावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
'ऑक्टोबर हीट' आवश्यक
◼️ दरवर्षी ऑक्टोबरमधील कडक उन्हामुळे जमिनीतील ओलावा नष्ट होतो.
◼️ गारठा/थंडी सुरू होताच झाडांच्या मुळांवर ताण येऊन मोहोर प्रक्रिया सुरू होते.
◼️ यावर्षी ऑक्टोबर संपला तरी पाऊस सुरू आहे. झाडांच्या बुंध्यामध्ये पाणी आहे.
◼️ यामुळे मोहोर येण्याऐवजी पालवी येण्याचे प्रमाण वाढले आहे.
◼️ त्यामुळे पालवी होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
डिसेंबर/जानेवारीत मोहोर येण्याची शक्यता
पालवी जून होईपर्यंत डिसेंबर उजाडणार आहे. डिसेंबरमध्ये गारठ्यामुळे मोहोर प्रक्रिया सुरू झाल्यानंतरच आंबा हंगामाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मात्र, तोपर्यंत बागायतदारांना पालवीसह मोहोर सुरू झाल्यास संरक्षण करण्याची जबाबदारी वाढली आहे.
गेले सहा महिने पाऊस सुरू आहे. जमिनीतील पाण्याचे प्रमाण वाढल्याने झाडांना पालवी सुरू झाली आहे. ऑक्टोबर हीट जाणवली नसल्यामुळे मोहोर प्रक्रियेला विलंब होत आहे. मोहोर प्रक्रियेला विलंब झाला तर फळधारणा प्रक्रियाही लांबणार आहे. त्यामुळे यावर्षीचा आंबा हंगामही लांबण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिवाय किडी, तुडतुड्याचा प्रादुर्भाव झाला असून, फवारणी करून झाडांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहे; परंतु पावसामुळे फवारणीचा खर्च वाया जात आहे. - राजन कदम, बागायतदार
अधिक वाचा: पशुपालन व्यवसायास आता वीजदरात मिळणार सवलत; कुणाला मिळणार कसा लाभ? वाचा सविस्तर
