माणिक डोंगरे
मलकापूर : कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक हे बासमती तांदळासाठी पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. त्यातच आता येथील प्रगतशील सूर्यवंशी पिता-पुत्र शेतकऱ्यांनी शुगर फ्री भाताच्या लागण केली आहे.
यामुळे आता हे गाव आरोग्यदायीभाताचे केंद्र म्हणून उदयास येत आहे. तसेच, या शेतकऱ्यांनी शेतीत केलेला वेगळा प्रयोगही चर्चेचा विषय ठरत आहे.
रेठरे बुद्रुक गाव राजकारणातील ओळखीमुळे चर्चेत आहेच. तसेच, अनेक वर्षांपासून कृषी क्षेत्रात इंद्रायणी व बासमती भाताचे गाव म्हणूनही नावारूपाला आले आहे.
याच रेठरे बुद्रुक गावातील प्रगतशील शेतकरी अशोक सूर्यवंशी आणि त्यांची मुले दिग्विजय व अनिरुद्ध सूर्यवंशी यांची प्रयोगशील शेतकरी म्हणूनही परिसरात चांगली ओळख झाली आहे.
रेठरा बासमतीची चार राज्यांत ऑनलाईन विक्री
◼️ दिग्विजय सूर्यवंशी हे आपल्या कल्पक बुद्धीतून शेतीसाठी हिरवळीचे खत म्हणून तागाचे बियाणे उत्पादित करून विक्री करतात. त्यांच्या बियाण्याला मागणी आहे.
◼️ पश्चिम महाराष्ट्रासह तेलंगणा, गुजरात, कर्नाटक राज्यांतही त्यांनी रेठरा बासमतीचे बियाणे व तांदूळ ऑनलाईन विकला आहे.
आमच्या जमिनीतील भात फक्त मधुमेह रुग्णांसाठीच नव्हे, तर सर्वांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. त्यामध्ये कमी साखर, जास्त फायबर आणि पोषणमूल्य आहेत. शुगर फ्री आणि आरोग्यदायी तांदळाचा पर्याय निर्माण झाल्याने परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही शुगर फ्री भात लागवडीद्वारे नवी दिशा मिळू शकते. - दिग्विजय सूर्यवंशी, शेतकरी
अधिक वाचा: पाणंद रस्त्यावर झालेले अतिक्रमण काढण्यासाठी शासन घेतंय 'हा' महत्वपूर्ण निर्णय; लवकरच जीआर काढणार