सांगोला : तालुक्यात रब्बीज्वारीचीपेरणी तब्बल एक महिना लांबणीवर पडल्यामुळे ज्वारीचे क्षेत्र सुमारे ७० टक्के घटले आहे तर मका पिकाचे क्षेत्र तिपटीने वाढले आहे.
रब्बी ज्वारी सुमारे ११ हजार ८११ हेक्टर क्षेत्रावर (३१ टक्के) तर मका सुमारे १५ हजार ०९९ हेक्टर क्षेत्रावर (२९२ टक्के) पेरणी झाल्याचे माहिती तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव यांनी दिली आहे.
सांगोला तालुका कृषी कार्यालयाकडून चालू वर्षी रब्बी ज्वारीसाठी सुमारे ३७ हजार ४७९ हेक्टर क्षेत्रावर सरासरी पेरणीचे नियोजन केले होते.
परंतु ऐन रब्बी हंगामाच्या कालावधीत सप्टेंबर महिन्यात सलग पाऊस पडत गेल्यामुळे शेताशिवारात पाणी साचल्याने वापसाअभावी रब्बी ज्वारीची पेरणी तब्बल एक महिना खोळंबली होती.
दरम्यान, शेतकऱ्यांनी ऑक्टोबर महिन्यात जसा वाफसा येईल तसे रब्बी ज्वारीच्या पेरणीला सुरुवात केली होती. दरम्यान, गतवर्षी रब्बी ज्वारीची सुमारे २२ हजार ३३९ हेक्टर क्षेत्रावर तर मका १४ हजार ९६७ क्षेत्रावर पेरणी झाली होती.
तसं पाहिलं तर १५ ऑक्टोबरपर्यंत रब्बी ज्वारीची पेरणी पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु अतिरिक्त पाऊस आणि शेतात वापसा नसल्यामुळे यंदा ज्वारीचे क्षेत्र ७० टक्क्यांनी घटले आहे.
मका क्षेत्र तिपटीने वाढले असून गहू, हरभराचे क्षेत्रही वाढले आहे. पेरणीनंतर ज्वारीची चांगल्या प्रकारे उगवण झाल्यामुळे शेतकऱ्यांना ज्वारीचे भरघोस उत्पादन मिळणार आहे.
रब्बी हंगामातील पीक पेरणीची आकडेवारी
◼️ रब्बी ज्वारी ३७ हजार ४७९ हेक्टरपैकी ११,८११ हेक्टर (३१ टक्के)
◼️ गहू ८२२ हेक्टर पैकी १३८१ (१६८ टक्के)
◼️ मका ५१५६ हेक्टरपैकी १५०९९ हेक्टर (२९२ टक्के)
◼️ हरभरा ७६८ हेक्टरपैकी १२२४ हेक्टर (१५९ टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
यंदा रब्बी ज्वारी पेरणी हंगामाच्या सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये अतिवृष्टीचा पाऊस झाला, शेतात पाणी साचल्याने वापसा नव्हता त्यामुळे आपुसकच ज्वारीचे क्षेत्र घटले आणि मका, हरभरा, गहू क्षेत्र वाढले आहे. - दीपाली जाधव, तालुका कृषी अधिकारी, सांगोला
अधिक वाचा: राज्यातील 'या' ३८ साखर कारखान्यांनी मागील वर्षीच्या साखर हंगामात थकवली १४० कोटी एफआरपी
