भारतातील जंगली पर्वतीय भागात सुमारे ४२७ आदिवासी जमाती आहेत. जगभरात वनस्पर्तीच्या ३२ लाख ८३ हजार प्रजाती असून, भारतीय आदिवासी १,५३० पेक्षा अधिक वनस्पती दैनंदिन आहारात खाण्यासाठी वापरतात.
यात प्रामुख्याने १४५ कंद, ५२१ हिरव्या भाज्या, १०१ फुलभाज्या, ६४७ फळभाज्या, ११८ बियाणांच्या व सुकामेव्याच्या प्रजाती आहेत. आदिवासी ऋतुमानानुसार रानभाजांचा आपल्या आहारात उपयोग करत असतात.
रानभाजी टाकळा.. ही वनस्पती प्रामुख्याने पावसाळ्यात सर्वत्र उगवते. पडीक किंवा ओसाड जमीन, शेतात, बागेत, जंगलात, रस्त्याच्या कडेने कुठेही वाढते. सर्व प्रकारच्या त्वचारोगामध्ये ही वनस्पती अतिशय उपयुक्त आहे.
त्वचा जड झाल्यास ही वनस्पती खाल्ल्याने विशेष उपयोग होतो. इसब, अॅलर्जी, सोरायसेस, खरुज यासारखे त्वचा विकारही कमी होतात. पानांच्या भाजीच्या रूपात सेवन केल्याने पोटातील कृमी नष्ट होतात.
दात येणाऱ्या मुलांना ताप येतो, अशा वेळी टाकळ्याच्या पानांचा काढा त्यावर नियंत्रण करतो. पित्त, हृदयविकार, श्वास, खोकला या विकारांवर पानांचा रस मधातून दिला जातो.
ही भाजी मुळात उष्ण असल्यामुळे शरीरातील वात आणि कफ दोष कमी होण्यास मदत होते. पावसाळ्यात शरीराला सुटणारी खाजही कमी करते. अर्थातच हे सर्व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपाय करणं अत्यावश्यक आहे.
टाकळ्याची भाजी कशी करावी?
१) भाजीसाठी फुले येण्यापूर्वीची कोवळी पाने घ्यावीत.
२) पाने स्वच्छ धुऊन पाणी गळून जाऊ द्यावे, कढईत तेल टाकून कांदा परतून घ्या.
३) मोहरीची फोडणी घ्यावी.
४) त्यात ओली मिरची अथवा तिखट आवडीनुसार वा गरजेनुसार घालावे.
५) हळद टाकावी त्यानंतर त्यावर भाजी टाकून ती वाफेवर शिजू द्यावी.
६) भाजी शिजत आली की, थोडासा गूळ आणि मीठ घालावे. किसलेले ओले खोबरे घालावे.
७) भिजवलेली तूरडाळ किंवा फणसांच्या बियांचे बारीक तुकडे ती शिजत असताना टाकल्यास भाजी अधिकच चविष्ट बनते.
८) केवळ लसणाच्या पाकळ्यांमध्येही फोडणी घालून आणि हिंगाचा वापर करून ही भाजी रुचकर बनविता येते.
- प्रशांत आनंदराव सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी
अधिक वाचा: Ranbhajya : जीवनसत्वाचा खजिना असणाऱ्या 'या' रानभाज्या खा अन् आजारापासून दूर रहा