रत्नागिरी : मागील काही दिवस जिल्ह्यात ढगाळ हवामान असून, कुठल्याही क्षणी पाऊस कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बदलत्या हवामानामुळे उकाडाही वाढला आहे.
या हवामानातील बदलामुळे हापूसवर बुरशीजन्य व कीडरोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. दक्षिण छत्तीसगडपासून महाराष्ट्र, कर्नाटक ते उत्तर भागात हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे.
त्यामुळे पावसाला पोषक हवामान तयार झाल्याने जिल्ह्यात गेले दोन दिवस ढगाळ वातावरण आहे. हवामान विभागानेही पावसाची शक्यता वर्तवली आहे. आर्द्रता अधिक असल्यामुळे उष्याची तीव्रता अधिक आहे.
या वातावरणाचा सर्वाधिक फटका हापूसला बसला आहे. झाडावरील फळांवर डाग पडण्याची शक्यता आहे. पोखरणाऱ्या अळीमुळे फळाचा दर्जा घसरण्याचा धोका आहे.
हापूसचे उत्पादन कमीच असताना वातावरणातील बदलांमुळे बागायतदारांसमोर संकट निर्माण झाले आहे. त्यातच कमी दर मिळत असल्याने परिणामी खत व्यवस्थापन ते आंबाबाजारात येईपर्यंतचा खर्चही निघू शकणार नाही.
तसेच १५ एप्रिलपर्यंत आंब्याची आवक बाजारपेठेत वाढेल, असे सांगण्यात येत असले तरी हवामानावर आधारित पिकाचे भवितव्य अवलंबून आहे. ढगाळ वातावर, पावसाची शक्यता, वाऱ्याचा वाढलेला वेग असे वातावरण आणखी काही दिवस राहण्याची शक्यता आहे.
आंबा पेटीसाठी येणारा खर्च (रुपये)
लाकडी खोका - १०० ते १२५
कीटकनाशके - ५००
साफसफाई - ५००
कराराने आंबा बाग घेताना पेटीला मोजावे लागतात - ५०० ते ७००
बाग संरक्षण गुरखा खर्च - १००
वाहतूक खर्च - १००
फवारणी व पेट्रोल खर्च - ५०
काढणीसाठी मजुरी - १००
एकूण खर्च - २,००० ते २,५००
आंबा लागवड क्षेत्र - ६६,४३३ हेक्टर
उत्पादन - हेक्टरी १.२५ लाख टन दरवर्षी उलाढाल - ७०० ते ८०० कोटी
परदेशात विक्री ६० हजार टन
स्थानिक विक्री २० हजार टन
कॅनिंग प्रक्रिया - ३० हजार टन
अधिक वाचा: शेतजमिनीचे वाद होणार आता कमी, जमीन मोजणी प्रक्रियेमध्ये हे मोठे बदल; वाचा सविस्तर