शेतकऱ्यांना विमा रक्कम देण्यास थोडा विलंब झाला असला तरी शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यास आम्ही यशस्वी झालो याचा आनंद आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार असल्याचे सांगतानाच प्रत्येकाने आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडल्यास शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही.
असे सांगत प्रशासन आणि विमा कंपनीची पालकमंत्री नितेश राणे यांनी कानउघाडणी केली. ते आंबा काजू २०२४-२५ विमा नुकसान भरपाई वितरण कार्यक्रमावेळी बोलत होते.
सिंधुदुर्ग जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आणि भारतीय कृषी बीमा कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबा काजू २०२४-२५ विमा नुकसान भरपाई वितरण कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात झाला.
यावेळी पालकमंत्री नितेश राणे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तसेच अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, अरुण नातू, उमाकांत पाटील, विमा कंपनीचे बी. प्रभाकर, शेतकरी, विमा कंपनी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक करताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे म्हणाल्या की, फळपीक विमा योजना २०२४- २५ मध्ये जिल्ह्यातील ४३,२१९ शेतकऱ्यांना सहभाग घेत १७,५७७ हेक्टर क्षेत्र संरक्षित केले होते.
त्यामुळे या शेतकऱ्यांना ९० कोटी रुपयांची आंबा काजू विमा नुकसान भरपाई मिळणार आहे. यातील पहिल्या टप्यात ७४ कोटी रुपयांचा क्लेम मंजूर झाला आहे. प्रतिनिधी स्वरूपात काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई धनादेश दिले जात असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे म्हणाल्या की, प्रशासन आणि विमा कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने फळपीक विमा नुकसान भरपाई वितरण कार्यक्रम आज जिल्ह्यात झाला. असा एकत्रित कार्यक्रम हा राज्यातील पहिलाच कार्यक्रम आहे. यासाठी पालकमंत्र्यांनी विशेष प्रयत्न केले होते.
अधिक वाचा: कृषी यांत्रिकीकरण योजनेचा विक्रम, तब्बल ३२ लाख लाभार्थ्यांची निवड; शेतकऱ्यांना होणार दुहेरी फायदा