खायला चवदार व किफायतशीर दर, त्यात विविध पाककृतींमुळे वांग्याला प्रत्येक घरात स्वयंपाकघरात कायमचे स्थान मिळाले आहे. मात्र, चवीपलीकडेही वांग्यात अनेक औषधी गुणधर्म दडलेले आहेत. विशेषतः मेंदूचे आरोग्य, हृदयाची कार्यक्षमता आणि वजन नियंत्रण यासाठी वांगे उपयुक्त ठरते.
वर्षभर बाजारात उपलब्ध असलेले वांगे आपल्या आहारातील एक महत्त्वाचे फळभाजी पीक आहे. गावरान, हायब्रीड, जांभळी, हिरवी तसेच भरतासाठीची मोठी वांगी अशा विविध प्रकारांत ते आढळते. वांगे बाराही महिने बाजारात सहज उपलब्ध होतात. प्रत्येक स्वयंपाकघरात नेहमीच वांग्याचा मुक्काम असतो.
इतर भाज्यांसोबत वांगे घालून चविष्ट आणि रुचकर भाजी तयार करण्यात येते. आजही ग्रामीण भागात लग्न सोहळ्यात 'आलू-वांग्या'च्या भाजीची मेजवानी दिल्या जाते. वांग्याची भाजी ही अनेक जणांचा आवडता मेनू बनली आहे.
विविध प्रजातींच्या वांग्यांना ग्राहकांची विशेष मागणी
• सुधारित वाणांच्या वापरामुळे आज वांग्याचे वजन एक ते दीड किलोपर्यंत पोहोचते. गावरान जांभळी वांगी, भरतासाठीची मोठी हिरवी वांगी, गोल हायब्रीड वांगी तसेच लांबट जांभळी वांगी अशी विविधता बाजारात उपलब्ध आहे.
• उत्पादनक्षमता जास्त, रोगप्रतिकारक क्षमता चांगली आणि ग्राहकांची सातत्यपूर्ण मागणी, त्यामुळे या सुधारित जाती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहेत. तसेच वांगे आरोग्यासाठी उपयुक्त असल्याने ग्राहकांकडून मागणी होत आहे.
सालीत नॅसुनिन; मेंदूच्या पेशींचे संरक्षण
जांभळ्या वांग्याच्या सालीत नॅसुनिन हा प्रभावी अँटिऑक्सिडंट आढळतो. हा घटक मेंदूतील पेशींना हानी पोहोचवणाऱ्या फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करतो. परिणामी स्मरणशक्ती टिकून राहण्यास आणि मेंदूची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होते.
कोणकोणती जीवनसत्त्वे आणि त्यांचे फायदे काय?
वांग्यात व्हिटॅमिन बी-समूह, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के यांसारखी जीवनसत्त्वे आढळतात. बी-समूह जीवनसत्त्वे शरीराला ऊर्जा देतात आणि मज्जासंस्थेचे कार्य सुरळीत ठेवतात. व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारशक्ती वाढवते, तर व्हिटॅमिन के रक्ताच्या गाठी तयार होण्यास मदत करते.
वांगे खा, वजन कमी करा !
• वांग्यात कॅलरी कमी आणि तंतुमय पदार्थ जास्त असल्यामुळे ते वजन कमी करण्याच्या आहारात उपयुक्त ठरते. फायबरमुळे पोट भरल्याची भावना अधिक काळ टिकते आणि वारंवार भूक लागत नाही. परिणामी अतिरिक्त कॅलरीचे सेवन टाळले जाते.
• तळण्याऐवजी भाजून, उकडून किंवा कमी तेलात शिजवून खाल्ल्यास वांग्याचे पोषणमूल्य अधिक टिकून राहते आणि आरोग्यालाही फायदा होतो. त्यामुळे वजन कमी करण्यास वांगे अतिशय फायदेशीर ठरते.
पोटॅशियमचा साठा; रक्तदाबावर राहते नियंत्रण
वांग्यात पोटॅशियम मुबलक असल्यामुळे ते शरीरातील सोडियमचे संतुलन राखण्यास मदत करते. त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहण्यास हातभार लागतो. रक्तवाहिन्यांवरील ताण कमी होऊन हृदयाचे ठोके नियमित राहतात.
