नाशिक जिल्ह्याच्या बागलाण तालुक्यातील करंजाड शिवारात मक्याच्या खरेदी व्यवहारात तब्बल ५ लाख १० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी जायखेडा पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत जितेंद्र सुरेश चव्हाण (रा. सोमपूर, ता. बागलाण सध्या रा. म्हसरूळ, नाशिक) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी सिद्धार्थ अनिल काशिद (रा. प्लॉट नं. १३५, नेरूळ सेक्टर १६ ए, नवी मुंबई) व त्याचा मित्र व भागीदार प्रथमेश अटकरे (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) यांनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून मक्याची खरेदी केली.
आरोपींनी २५ टन ५०० किलो मका प्रति किलो २० रुपये या दराने खरेदी करून एकूण ५,१०,००० रुपयांचा व्यवहार केला. मका उचलून घेतल्यानंतर तीन दिवसांत रक्कम अदा करण्याचा करार झाला होता. मात्र ठरलेल्या मुदतीत पैसे न देता आरोपींनी टाळाटाळ सुरू केली.
त्यानंतर 'मका खराब होता' असे कारण देत पैसे देण्यास स्पष्ट नकार दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच, 'तुम्हाला जे करायचे ते करा, पैसे मिळणार नाहीत' अशी धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
शेतकरी वर्गात संताप
याप्रकरणी जायखेडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सागर काळे करीत आहेत. या घटनेमुळे शेतकरी वर्गात संताप व्यक्त होत असून, अशा प्रकारच्या खरेदी-विक्री व्यवहारात लेखी करार, आगाऊ रक्कम व खात्रीशीर मध्यस्थी आवश्यक असल्याची मागणी जोर धरू लागली आहे.
