जयसिंगपूर : रत्नागिरी-नागपूरमहामार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनीच्या मोबदल्याबाबत शेतकऱ्यांच्या मागणीला यश आले आहे.
अंकली ते चोकाकदरम्यानच्या महामार्गासाठी बाधित शेतकऱ्यांना चौपट दराने नुकसानभरपाई देण्यास बुधवारी राज्य शासनाने मंजुरी दिली, अशी माहिती आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.
दुप्पट दराने केवळ ९४ कोटी रुपये मिळणार होते. मात्र, चौपट दरामुळे १७१ कोटी रुपये मिळणार असून जवळपास ७६ कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभ शेतकऱ्यांना मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
रत्नागिरी-नागपूर महामार्गाच्या कामामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती, विहिरी व अन्य मालमत्ता बाधित झाली होती. या महामार्गाच्या बहुतांश टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना चौपट दराने मोबदला दिला होता.
मात्र, अंकली ते चोकाक या सुमारे ३३ किलोमीटरच्या टप्प्यात अधिग्रहित जमीनधारक शेतकऱ्यांना केवळ दुप्पट दराने भरपाई देण्याचा प्रस्ताव होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेत अखेर चौपट दराने नुकसान भरपाई देण्यास मंजुरी दिली. त्यामुळे या ३३ किलोमीटरच्या टप्प्यातील शेतकऱ्यांना चौपट दर देण्यास मंजुरी मिळाली आहे.
या निर्णयामुळे महामार्गासाठी बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याची माहिती आमदार यड्रावकर यांनी दिली.
दृष्टिक्षेपात महामार्ग
◼️ चोकाक, अतिग्रे, माणगाववाडी, हातकणंगले, मजले, निमशिरगाव, तमदलगे, जैनापूर, उमळवाड, उदगाव व अंकली अशी दहा गावे या महामार्गावर येतात.
◼️ चौपट मोबदल्यासाठी आंदोलनामुळे महामार्गाचे काम रखडले होते. बाधित शेतकऱ्यांना चौपट दर मिळणार असल्याने महामार्गाच्या कामाला गती येणार आहे.
◼️ महामार्गावर ९३७ बाधित शेतकरी असून जवळपास ६३ हेक्टर जमीन भूसंपादन होणार आहे. यामध्ये ५१४ बाधित गट आहेत.
दोन वर्षांचा प्रदीर्घ लढा
चोकाक ते अंकली रस्त्यासाठी शेतकऱ्यांना चौपट मोबदला मिळावा या मागणीसाठी गेली दोन वर्षे स्वाभिमानी व भारतीय किसान संघ यांच्यासह शेतकऱ्यांनी आंदोलने केली.
अधिक वाचा: रस्ते, धरणे व विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी शासनाचा महत्वाचा निर्णय; आता सर्व लाभ मिळणार एका ठिकाणाहून
