अहिल्यानगर : राज्यातील कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर भर देणाऱ्या कृषी समृद्धी योजनेंतर्गत २०२५-२६ वर्षासाठी अहिल्यानगर जिल्ह्यासाठी २२ कोटी २९ लाख मंजूर झाले आहेत.
शेतकऱ्यांना शेडनेट हाउसमध्ये हळद, ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी लागवड तसेच मध केंद्र, कांदाचाळ, केळी लागवड आदी बारा प्रकारच्या योजनेसाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी ६० टक्के व अनुसूचित जाती/जमातीसाठी ९० टक्के अनुदान देण्यात येणार आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या धर्तीवर, महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने २२ जुलै, २०२५ रोजी 'कृषी समृद्धी योजना' सुरू केली आहे.
या योजनेमध्ये अहिल्यानगर जिल्ह्याकरिता २२ कोटी २९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण करणे, उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादकता वाढवणे, पीक विविधीकरण करणे.
तसेच मूल्य साखळी बळकट करणे, तसेच हवामान अनुकूल आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा या योजनेचा उद्देश आहे.
योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे.
बारा योजनांना मिळणार अनुदान
१) शेडनेट हाउसमध्ये मातीविरहित ब्ल्यू बेरी लागवड.
२) मातीविरहित हळद लागवड.
३) स्ट्रॉबेरी लागवड.
४) मध उत्पादन व प्रक्रिया केंद्र.
५) कांदाचाळ.
६) केळी लागवड.
७) शीतगृह उभारणी.
८) एकात्मिक पॅक हाउस.
९) जीवामृत स्लरी प्रकल्प.
१०) ऑटोमॅटिक फर्टिगेशन व इरिगेशन शेड्यूल्डिंग युनिट.
११) भाजीपाला निर्जलीकरण प्रक्रिया युनिट.
१२) ग्रेडिंग, वॅक्सिंग, पॅकिंग युनिट उभारणी.
अधिक वाचा: उसातील सोयाबीनच्या आंतरपिकाने केला चमत्कार; ३२ गुंठ्यांत साडेसोळा क्विंटल अन् ९० हजारांची कमाई
