आंधळगाव : मंगळवेढा तालुक्यात आंधळगाव परिसरात शेतकऱ्यांचा तूर पिकाकडे कल वाढला आहे. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर आणि वाढत्या उत्पादन खर्चामध्ये तूर हे कमी खर्चात जास्त नफा देणारे हमखास पीक ठरले आहे.
या पार्श्वभूमीवर शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीचा वापर करून तुरीची यशस्वी शेती करणारे शेतकरी पांडुरंग भाकरे व दिगंबर भाकरे हे सध्या चर्चेत आहेत.
सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठे नुकसान झाले होते. काही दिवस तर संपूर्ण क्षेत्र पाण्याखाली गेल्याने पीक हातातून जाईल, अशी परिस्थिती होती. मात्र, शेतकऱ्यांनी हार न मानता पुन्हा कंबर कसली.
लागवडीच्या अंतरात बदल, सुधारित वाणांचा वापर व व्यवस्थापनातील बाबी यांच्या आधारे एकरी ८ ते १२ क्विंटलपर्यंत उत्पादकता प्रगतशील बागायतदार पांडुरंग भोकरे, दिगंबर भाकरे यांनी आजपर्यतच्या काळात साध्य केली.
दरवर्षी १० ते १२ एकरांपर्यंत त्यांचे तुरीचे क्षेत्र असते. पूर्वी ते दोन ओळींत दीड फूट व दोन रोपांत सहा इंच या पद्धतीने लागवड करायचे.
पाच जून ते तीन जुलैपर्यंत ते पेरणी पूर्ण करतात. आज त्यांच्या शेतातील तूर मोठ्या प्रमाणात बहरलेली आहे. शेंगांच्या वजनाने झाडे झुकू लागली आहेत.
पिकाची वाढ पाहता यंदा चांगल्या उत्पादनाची अपेक्षा व्यक्त केली जात असून तुरीने पुन्हा एकदा या भागात उभारी घेतल्याचे चित्र दिसत आहे.
हवामान कितीही बिघडले तरी शेती सोडायची नाही. यावर्षी गोदावरी वाणाची तूर बारा एकर क्षेत्रांवर लागवड केली आहे. योग्य वेळी उपाययोजना केल्या, आधुनिक तंत्रज्ञान पद्धती वापरल्या आणि मेहनत घेतली, तर पीक वाचवता येते उलट अधिक चांगले उत्पादनही मिळू शकते. - पांडुरंग भाकरे, प्रगतशील शेतकरी, आंधळगाव
शेतीत नवनवीन प्रयोग करणे हेच आजच्या काळाचे वैशिष्ट्य आहे. हवामान बदलत आहे, पावसाचा अंदाज लागत नाही. अशा वेळी तंत्रज्ञानावर विश्वास ठेवला पाहिजे. दरवर्षी नवीन वाणांचा प्रयोग करणे, सेंद्रिय खतांचा वापर करणे आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीत सातत्याने सुधारणा करणे हे यशाचे रहस्य आहे. - दिगंबर भाकरे, संचालक, दामाजी शुगर
अधिक वाचा: शेतात ड्रोन उडवण्यासाठी आता परवानगीची गरज नाही; केंद्र सरकारने 'हा' नियम केला शिथिल
